उमरगा – उमरगा तालुक्यातील नाईचाकुर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत अज्ञात चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकत तब्बल १९ लाख ३१ हजार ३४९ रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवार, दि. २६ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री १.०० ते पहाटे ४.१५ च्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन अज्ञात व्यक्तींनी बँकेच्या दोन्ही चॅनेल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने बँकेतील तिजोरी फोडली आणि त्यातील १९,३१,३४९ रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
याप्रकरणी बँकेचे शाखा अधिकारी श्री. आशिष नागनाथ बनसोडे (वय ३०, रा. चिवरी, ता. तुळजापूर) यांनी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ३३१ (१), ३०५ (ए)(इ), आणि ३ (५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांसमोर आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे मोठे आव्हान आहे.
शेळ्या चोरणारी टोळी गजाआड; शिराढोण पोलिसांची वेगवान कारवाई
शिराढोण: कळंब तालुक्यातील ताडगाव येथून ३० हजार रुपये किमतीच्या तीन शेळ्या चोरणाऱ्या त्रिकुटाला अटक करण्यात शिराढोण पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरलेल्या शेळ्या जप्त केल्या असून, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
याप्रकरणी उत्रेश्वर रामा जाधवर (वय ३२, रा. ताडगाव) यांनी फिर्याद दिली होती. त्यांच्या घरासमोरून २२ ऑगस्टच्या रात्री तीन शेळ्या चोरीला गेल्या होत्या. त्यांनी २६ ऑगस्ट रोजी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिवराम सुभाष मुंडे (रा. गोविंदपुर) याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून चोरीच्या शेळ्या जप्त केल्या.
चौकशीदरम्यान, शिवराम मुंडे याने हा गुन्हा आपण, पिंटु माणिक काळे (रा. शिराढोण पारधी पिडी) आणि दत्ता सिताराम काळे (रा. गोविंदपुर) या तिघांनी मिळून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.