अहो ऐकलंत का? महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘हम साथ साथ हैं‘चा सिक्वेल सुरू झालाय. दिग्दर्शक ‘जनता’ आणि निर्माते ‘काळ’ यांनी मिळून असा काही कौटुंबिक चित्रपट पडद्यावर आणलाय की बस्स… गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटात एकामागोमाग एक असे काही ‘ट्विस्ट’ येत आहेत की प्रेक्षक, म्हणजेच आपण, पार चक्रावून गेलोय.
एपिसोड १: बीडचा ‘रक्षाबंधन’ स्पेशल
चित्रपटाची सुरुवात झाली बीडच्या मातीतून. जिथे बहीण-भाऊ, म्हणजेच पंकजाताई मुंडे आणि धनंजयभाऊ मुंडे, यांच्यात राजकीय वैर होतं. एकाच घरात, पण दोन वेगळ्या राजकीय चुली. पण अचानक काय झालं कुणास ठाऊक, भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा झरा वाहू लागला. राजकीय मतभेद विसरून कौटुंबिक कर्तव्याला जागले. बीडच्या जनतेने तर आनंदाने थेटरात शिट्ट्याच मारल्या. चला, एक घर तरी एक झालं! ‘एपिसोड’ हिट!
एपिसोड २: मुंबईचा ‘ठाकरे’ ब्रँड रिलॉन्च – मराठी’च्या मुद्द्यावर!
पहिला एपिसोड हिट झाल्यावर दिग्दर्शकाचा उत्साह वाढला. मग आला दुसरा, बहुप्रतिक्षित एपिसोड – ‘ठाकरे बंधू रियुनियन’. उद्धवजी आणि राजसाहेब! या रियुनियनमागचं कारण ठरला तो मूळचा सुपरहिट फॉर्म्युला – ‘मराठी माणूस’ आणि ‘मराठीचा मुद्दा’. असं म्हणतात की, दिल्लीच्या ‘हिंदी’ शक्तीला थेट आव्हान देण्यासाठी मुंबईत ‘मराठी’ शक्ती एकवटली.
ज्या क्षणाची अवघा महाराष्ट्र गेली कित्येक वर्षं वाट बघत होता, तो क्षण अखेर आला. दोन भाऊ, दोन पक्ष, दोन झेंडे, पण आता सूर जुळले. आता सगळ्या महाराष्ट्राचं, विशेषतः मुंबईकरांचं लक्ष एकाच गोष्टीकडे लागलंय: हे दोन भाऊ आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकत्र लढणार का? जर तसं झालं, तर हा फक्त ‘ब्लॉकबस्टर’ नाही, तर ‘ऑल-टाईम ब्लॉकबस्टर’ ठरेल!
आणि आता… ‘क्लायमॅक्स’ची प्रतीक्षा!
हे दोन सुपरहिट एपिसोड बघितल्यावर, आता तमाम महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न घुमतोय, “अहो, ठीक आहे… बहीण-भाऊ आले, भाऊ-भाऊ आले… पण आता ‘काका-पुतण्या’ कधी एकत्र येणार?”
होय, तुम्ही बरोबर ओळखलंत. आपलं लक्ष आहे बारामतीच्या ‘पॉवर-सेंटर’कडे! म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब आणि ‘दादा’ अजित पवार यांच्याकडे.
सध्या यांची कथा अशी आहे की, घड्याळ एकाच घरात आहे, पण त्याचे दोन काटे दोन वेगवेगळ्या दिशांना फिरतायत. एक काटा ‘दिल्ली’कडे बघतो, तर दुसरा ‘मुंबई’तच रमतो. एकाच घरात दोन पक्ष स्थापन करण्याचा विश्वविक्रम कदाचित याच घराण्याच्या नावावर लिहिला जाईल. सकाळचा शपथविधी, दुपारची दिलजमाई, संध्याकाळची टीका आणि रात्री पुन्हा ‘कौटुंबिक’ चर्चा… यांच्या राजकीय ‘डेली सोप’ने तर सास-बहूच्या मालिकांनाही मागे टाकलंय.
विनोद बाजूला ठेवला तर काही गंभीर प्रश्न उरतात:
- स्क्रिप्ट कुठे अडलीय? मुंडेंची स्क्रिप्ट ‘कौटुंबिक’ होती, ठाकरेंची ‘मराठी अस्मिता’ होती. पवारांच्या रियुनियनची स्क्रिप्ट ‘विकास’ असेल की ‘पॉवर’? की अजून फायनलच होत नाहीये?
- मुख्य हिरो कोण? चित्रपटाचा शेवट गोड करायचा म्हणजे कुणीतरी एक पाऊल मागे घ्यावे लागेल. पण इथे तर ‘जाणता राजा’ आणि ‘दादा’, दोघेही आपापल्या जागी ‘हिरो’ आहेत. मग ‘साइड हिरो’ कोण होणार?
- की हे सगळं आपल्याला दाखवण्यासाठी आहे? आतून सगळं ‘ऑल इज वेल’ आहे आणि बाहेर फक्त जनतेच्या मनोरंजनासाठी हा ‘राजकीय खेळ’ चालू आहे? काहीही असू शकतं!
थोडक्यात काय, तर महाराष्ट्राची जनता सध्या पॉपकॉर्नचा मोठा डबा घेऊन या ‘फॅमिली ड्रामा’च्या क्लायमॅक्सची वाट बघत आहे. मुंडे आणि ठाकरे घराण्यांनी आपापल्या घरात ‘दिलजमाई’चा गोड पदार्थ बनवलाय. आता पवार घराण्यात कधी ‘पुरणपोळी’चं जेवण होणार, याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय.
तोपर्यंत वाट बघूया… कारण राजकारणात कधीही, काहीही होऊ शकतं! पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!
– बोरूबहाद्दर