मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना महाविकास आघाडीत जागावाटपाचा प्रश्न इतका टोकाला गेला आहे की, काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे), आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सध्या गोंधळाच्या अतिरेकात गुंतलेले दिसत आहेत. निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असताना, जागावाटपाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गट एकमेकांच्या विरोधात चक्क ‘रुसवे-फुगवे’ करत आहेत.
प्रारंभी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ‘85-85-85’ फॉर्म्युला ठरवला होता, पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी हा फॉर्म्युला बदलून 90-90-90 असे जाहीर केल्याने काँग्रेस आणि ठाकरे गटातला ‘रुसवाफुगवा’ आणखीनच चिघळला आहे. फॉर्म्युला ठरला, पण कोणत्या जागा कोणाला मिळणार यावर सहमती न झाल्याने काँग्रेस आणि ठाकरे गटात वादाचा नवा अध्याय सुरू झाला. यावरून काँग्रेसने स्वतःला ‘मोठा भाऊ’ समजायला सुरुवात केली असून, ठाकरे गटाच्या ताकदीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांनी काँग्रेस दावा केलेल्या 12 जागांवर परस्पर उमेदवार जाहीर केले यामुळे नाराजी व्यक्त करणारे पत्र लिहिले. हे पत्र पाहून उद्धव ठाकरे इतके चिडले की, त्यांनी तातडीने काँग्रेसशी बोलणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मातोश्रीवर येणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर याचा फटका बसला आहे, कारण उद्धव ठाकरेंनी त्यांना चहा-नाश्ता देण्यासदेखील मनाई केली असल्याची बातमी आहे.
‘एबी फॉर्मवरून उठला ‘वादाचा अ-फॉर्म्युला’
ठाकरे गटाने काँग्रेसने दावा केलेल्या 12 जागांवर त्यांच्या उमेदवारांना एबी फॉर्म देऊन उमेदवारी जाहीर केली आहे. एबी फॉर्म दिल्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच संतापले. त्यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा विरोध दर्शवला. त्यावर ठाकरे यांनी ‘आता काँग्रेसशी बोलायचं नाही’ असा निर्णय जाहीर करत, मातोश्रीवर येणाऱ्या काँग्रेस नेत्यांना थेट ‘कुंडी बाहेरून बंद’ ची सूचना दिली आहे. काँग्रेस नेत्यांना यापुढे मातोश्रीवरून जवळची चहापानाची सोय उपलब्ध होणार नाही, अशी टीका शिवसैनिकांमध्ये होत आहे.
‘मोठ्या भावाची’ नव्हे, ‘भाऊगिरीची’ रुसवे-फुगवे खेळी
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या भावाची भूमिका मिळाली होती, पण विधानसभेत शिवसेना (उद्धव ठाकरे) गट काँग्रेसची भाऊगिरी सहन करत नाही. “आम्हाला कमी समजतात तर आम्हाला सोडावं, असं का नाही म्हणतात?” अशा तिखट शब्दात ठाकरे गटाने काँग्रेसला प्रश्न विचारला आहे. काँग्रेस नेत्यांनी ठाकरे गटाची ताकद कमी असल्याचे सांगितल्याने ठाकरे गटाला धक्का बसला आहे.
फॉर्म्युला ठरतो, पण ‘जागा वाटपाची शिजते घुटाळ्याची भाजी’
महाविकास आघाडीच्या सुरुवातीच्या चर्चेत तिन्ही प्रमुख पक्ष प्रत्येकी 85 जागांवर लढणार होते. नंतर बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, आता फॉर्म्युला 90-90-90 झाला आहे. त्यामुळे आता ‘उरलेल्या’ जागा कोणाच्या? काँग्रेस की शिवसेनेच्या उमेदवारांची उमेदवारी फॉर्मवर लिहिणार? यावरून नेत्यांमध्ये ‘पुढील पत्रव्यवहार’ वाढणार, अशी शक्यता आहे.
यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे मध्यस्थाची भूमिका बजावत असून, आता ते ‘रुसलेल्यांना समजावतील की फुगलेल्यांना?’ हे पाहणं रंजक ठरणार आहे.