धाराशिव – आगामी विधानसभा निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. धाराशिव, तुळजापूर, उमरगा, परंडा या चार प्रमुख विधानसभा मतदारसंघांमध्ये ही राजकीय टक्कर रंगणार आहे. मागील निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र येत, चारही मतदारसंघात भगवा फडकवण्यात यशस्वी ठरले होते. परंतु, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बदललेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीचा जन्म झाला, ज्याने नंतरच्या काळात महाराष्ट्रातील राजकारणात मोठे बदल घडवून आणले.
शिवसेनेतील फूट आणि एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या आगमनाने नव्या महायुतीचा उदय झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या महायुतीत सामील झाल्याने या गटाचे वर्चस्व वाढले. या पार्श्वभूमीवर, नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत या दोन मोठ्या राजकीय गटांमध्ये सरळ सामना होणार आहे.
महायुतीमध्ये धाराशिवच्या जागेसाठी भाजप आणि शिंदे गटात उमेदवारीवरून तणाव वाढला असून, या जागेची चर्चा अधिकच तापली आहे. परंड्यामध्ये आ. तानाजी सावंत आणि आ. उमरग्यात ज्ञानराज चौगुले फिक्क्स आहेत तर तुळजापूरमध्ये भाजपचे राणा जगजितसिंह पाटील यांची उमेदवार निश्चित आहे. याउलट, महाविकास आघाडीत धाराशिव वगळता बाकीच्या तीन मतदारसंघांत तिढा कायम आहे.
धाराशिवचे विद्यमान आमदार कैलास पाटील यांचे तिकीट निश्चित असले, तरी परंडा , उमरगा आणि तुळजापूरमध्ये उमेदवारीवरून मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. परंडा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात तीव्र स्पर्धा आहे, तर तुळजापूरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष दिसून येत आहे. उमरगा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तणाव वाढला आहे.
याच पार्श्वभूमीवर, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक बोलावली होती. या बैठकीत धाराशिव, परंडा आणि उमरगा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात कामाला लागावे, असे आदेश ठाकरे यांनी दिले आहेत.निवडणुकीच्या तोंडावर महायुती आणि महाविकास आघाडीमधील या संघर्षातून कोणता पक्ष वर्चस्व गाजवेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.