धाराशिव विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत मोठा राजकीय रंगतदार सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महायुतीकडून कळंब तालुक्याचे भाजप तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांचे नाव उमेदवारीसाठी जवळपास निश्चित झाल्याचे समजते. विशेष म्हणजे, या निवडणुकीत पिंगळे हे शिवसेना (शिंदे गट) तर्फे निवडणूक लढवण्यासाठी पुन्हा शिवसेनेत प्रवेश करण्याची तयारी करत आहेत. यामुळे धाराशिव मतदारसंघात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) असा थेट लढा रंगणार आहे.
अजित पिंगळे हे कळंब तालुक्यातील एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार कैलास पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पिंगळेंनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना 20,570 मते मिळाली होती, परंतु शेवटी शिवसेनेचे कैलास पाटील हे मोठ्या मताधिक्याने विजयी ठरले. पराभव पत्करल्यानंतर पिंगळेंनी शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते कळंब तालुकाध्यक्षपदावर कार्यरत राहिले.
धाराशिव विधानसभा मतदारसंघाची जागा महायुतीतून शिवसेना (शिंदे गट) ला सुटल्याने पिंगळे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत. या निवडणुकीत पिंगळे हे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे विद्यमान आमदार कैलास पाटील यांच्या विरोधात लढणार आहेत. त्यामुळे यावेळी धाराशिवमध्ये मशाल विरुद्ध धनुष्यबाण असा थेट सामना होणार असून मतदारसंघात राजकीय वातावरण तापलेले आहे.
या निवडणुकीसाठी शिवसेना (शिंदे गट) तर्फे एकूण आठ इच्छुक उमेदवार होते, परंतु त्यांच्यात उमेदवारीसाठी एकमत होणे कठीण गेले. शिवसेना (शिंदे गट) मधील नेत्यांच्या चर्चेनंतर अखेर पिंगळेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता बळावली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ मंगळवार हा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे पिंगळेंची उमेदवारीची अधिकृत घोषणा लवकरच होईल अशी अपेक्षा आहे.
धाराशिवमध्ये यावेळी निवडणुकीची रंगत वाढली आहे. अजित पिंगळेंचा प्रवेश आणि त्यांच्याविरुद्ध कैलास पाटील यांचा थेट मुकाबला यामुळे मतदारसंघात विशेषत: शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. या लढतीकडे सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले असून दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचाराची तयारी सुरू आहे.