(ठिकाण: गावातील चहाची टपरी)
पात्र:
- सोम्या: नुकताच पेपर वाचून आलेला.
- गोम्या: राजकारणाची खडानखडा माहिती ठेवणारा
- गोप्या: सामान्य नागरिक, रस्त्याच्या धुळीने त्रस्त.
(गोप्या चहाचा कप तोंडाला लावणार इतक्यात जोरात ठसकतो)
सोम्या: आरं, काय झालं गोप्या?
गोप्या: (डोळे पुसत) काय न्हाय रं… त्यो चहा घशात न्हाय, धाराशिवची धूळ घशात गेलीया वाटतं. आरं मेलं ह्या रस्त्याचं काय व्हणार हाय का न्हाय? परवा ‘दादा’च्या (राणा पाटील) कार्यकर्त्यांनी मोप ‘होरडिंग’ लावले व्हते… “६० कोटी वाचवले”… “सत्कार” घेतला… आन आता?
सोम्या: आरं, तेच सांगायला आलोय. त्योच मोठा ‘खेळ’ झालाय! शासनानं त्या १४० कोटीच्या कामाला ‘स्थगिती’ दिलीया. परत थांबलंव काम!
गोम्या: (चहाचा भुरका मारत) थांबणारच! आरं, हे ‘विकास’ बिकास न्हाय, हे ‘हिशोब बरोबर’ करायचं राजकारण हाय!
गोप्या: ‘हिशोब बरोबर’? आरं कशापायी?
गोम्या: आरं येड्या… तुला काय वाटलं, ते ‘होरडिंग’ लावले, ‘सत्कार’ घेतले म्हंजी काम सुरू झालं? सगळा ‘नाटकी’ खेळ हाय त्यो. आपला ‘दादा’ (राणा पाटील) आन त्यो ‘पालकमंत्री’ (प्रताप सरनाईक) ह्यांची जुंपलीया पार…
सोम्या: व्हय व्हय… म्या बी ऐकलं. त्यो ‘शुक्राचार्य’ बिर्काचार्य म्हनून कायतरी पोस्टा टाकायलेत कार्यकर्ते…
गोम्या: आरं, त्योच तर… पयले ऐक. आपल्या ‘दादा’नं काय केलं? त्यो पालकमंत्रीच्या २६८ कोटीच्या DPC च्या कामाला ‘खो’ घातला. मंग त्यो पालकमंत्री गप बसनार व्हय? त्यानंबी शिंगावर घेतलं.
गोप्या: मंग त्यानं काय केलं?
गोम्या: त्यानं काय? ‘दादा’च्या मर्जीतील त्यो ‘अजमेरा’ कंत्राटदार हाय ना… त्योच १४० कोटीच्या रस्त्याचं काम बघनार व्हता. पालकमंत्रीनं डायरेक्ट वरी (एकनाथ शिंदे) बोलून त्या कामालाच ‘स्थगिती’ आणली. झालं? हिशोब बरोबर!
सोम्या: आरं च्याआयला… म्हंजी ‘तू माझी जिरवली, मी तुझी जिरवतो’ असा खेळ चाललाय व्हय!
गोप्या: (कपाळावर हात मारत) मंग आपलं काय? ह्यांच्या ‘जिरवाजिरवी’त आपण मेलं धुळ खायची व्हय? १८ महिने झालं नुसता ‘खेळखंडोबा’ बघायलोय. आरं, जिल्ह्याच्या ठिकानची रस्ता हाय का गावचा ‘पायंद’ हाय, कळंना झालंय.
गोम्या: आरं, ह्यांना काय घेनंदेनं… दोघंबी ‘महायूतित’ हायती. वर दावत्यात एक हाय, आन खाली एकमेकाचे पाय वढायलेत. ‘दादा’नं परस्पर ‘कार्यारंभ’ आदेश काढला… पालकमंत्र्यानं त्योबी ‘थांबवला’.
गोप्या: अवघड हाय… ह्यांच्या भांडणात आपला धाराशिवचा विकास ग्येला खड्ड्यात. चला रं… आपलं काम बरं!






