धाराशिव – ‘महायुतीत’ सख्य आणि धाराशिवमध्ये मात्र ‘वैर’! भाजप आमदार राणा पाटील आणि शिवसेना (शिंदे गट) पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या ‘जशास तसे’ V/S ‘जैसे थे’ च्या राजकीय नाट्यात, धाराशिवच्या १४० कोटींच्या रस्ते विकासाचा अक्षरशः खेळखंडोबा झाला आहे. ‘हिशोब बरोबर’ करण्याच्या या ‘पॉवरगेम’मध्ये, दोन्ही नेत्यांनी जिल्ह्याच्या विकासालाच ‘स्थगिती’ दिल्याचे संतापजनक चित्र समोर आले आहे.
या राजकीय ‘बदला’ सत्राची ठिणगी एप्रिल महिन्यात पडली. आमदार राणा पाटील यांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत, जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) २६८ कोटींच्या कामांना ‘ब्रेक’ लावला, अर्थात स्थगिती मिळवली. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, या कामांमध्ये पालकमंत्री सरनाईक यांच्या मर्जीतील तब्बल ४० टक्के कामे होती, तर आमदार पाटलांच्या वाट्याला केवळ १५ टक्के कामे आली होती.
हाच ‘अपमान’ पालकमंत्री सरनाईक यांना जिव्हारी लागला. त्यांनी ‘बदला’ घेण्यासाठी थेट आमदार राणा पाटील यांच्या मर्जीतील समजल्या जाणाऱ्या ‘अजमेरा’ कंत्राटदाराला देण्यात येणाऱ्या, धाराशिव शहरातील १४० कोटींच्या रस्ते कामावरच ‘वार’ केला. सरनाईक यांनी (कथितपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत) या कामाला ‘स्थगिती’ आणली. झाला ना ‘हिशोब बरोबर’!
पण हा वाद इथेच थांबला नाही. नगर पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर आल्याने विरोधकांनी टीकेची झोड उठवली. त्यामुळे, आमदार राणा पाटील यांनी २६८ कोटींपैकी फक्त २२ कोटींच्या कामांवरील स्थगिती ‘दिखाव्यापुरती’ उठवली आणि उरलेल्या कामांसाठी ‘पुन्हा टेंडर’ प्रक्रिया सुरू केली. पण खरा ‘खेळ’ तर पुढे होता. आमदार पाटलांनी, पालकमंत्री सरनाईक यांना विश्वासात न घेता, ‘परस्पर’च त्या १४० कोटींच्या रस्ते कामाचे कार्यारंभ आदेश काढण्याचा घाट घातला.
मग काय! पुन्हा एकदा ‘पॉवरगेम’ सुरू झाला. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी हा ‘परस्पर’ व्यवहार होऊ दिला नाही. त्यांनी थेट शासनावरून (नगर विकास विभाग) या १४० कोटींच्या कामाला पुन्हा एकदा ‘स्थगिती’ आणली—तीच स्थगिती, जिचे पत्र (दि. २८ ऑक्टोबर) आता समोर आले आहे.
आता या १४० कोटींच्या कामाला पुन्हा स्थगिती मिळताच, आमदार राणा पाटील यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर ‘तीन पैकी एक शुक्राचार्य प्रकटला, उर्वरित दोन पण लवकरच….’ अशा सूचक पोस्ट करत थेट पालकमंत्र्यांवरच निशाणा साधला आहे.
या ‘शुक्राचार्यांच्या’ लढाईत, धाराशिवकर मात्र खड्डेमय आणि धुळीने माखलेल्या रस्त्यांवरून प्रवास करत आहेत. नेत्यांचा ‘हिशोब’ तर बरोबर झाला, पण जनतेच्या नशिबातील यातनांचा ‘हिशोब’ कोण करणार?





