परंडा (जिल्हा धाराशिव): शहरातील सिना कोळेगाव कॉलनी समोरील मुख्य रस्त्यावर लोकांच्या जिवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने उघड्यावर तलवार घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला परंडा पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडील तलवार जप्त केली असून, आरोपीवर शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर सुरेश सोनमुखे (वय ३०, रा. एसार पेट्रोल पंपाच्या समोर, गार भवानी मंदिराच्या बाजूला, परंडा) असे आरोपीचे नाव आहे. दि. २३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सिना कोळेगाव कॉलनी समोरील रस्त्यावर आरोपी ज्ञानेश्वर हा विनापरवाना आणि बेकायदेशीररीत्या हातामध्ये तलवार बाळगून असल्याचे पोलिसांना आढळून आले.
सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे घातक शस्त्र बाळगल्याने लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. परंडा पोलिसांच्या पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडील तलवार जप्त केली.
याप्रकरणी पोलीस अंमलदार सागर दादासाहेब कंचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, परंडा पोलीस ठाण्यात आरोपी ज्ञानेश्वर सोनमुखे याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम (Arms Act) कलम ४ आणि २५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.






