तुळजापूर- तुळजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नळदुर्ग ब्रिजवर पवनचक्कीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या एका व्यक्तीला अडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच धक्काबुक्की करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. “मी आमदार राणा पाटील यांचा पीए आहे, रितू खोकर आणि निलेश देशमुख यांना सांगून तुझी नोकरी घालवतो,” अशी धमकी देत संबंधित व्यक्तीने कर्तव्यावर असलेल्या पोलिसाच्या डोक्यातील टोपी उडवून धक्काबुक्की केली. ही घटना ११ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे २.१५ च्या सुमारास घडली.याबाबत तुळजापूर पोलीस ठाण्यात स्टेशन डायरीला (GD No. 003) नोंद करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
तुळजापूर पोलिसांचे पथक रात्रगस्त घालत असताना नळदुर्ग ब्रिजवरून पवनचक्कीचे साहित्य घेऊन जाणारे एक वाहन जात होते. यावेळी रस्ता क्रॉसिंगवरून पवनचक्की कर्मचारी सुरेंद्र सिंग, बिरसा सिंग आणि मनोज माडजे (रा. तीर्थ बु., ता. तुळजापूर) यांच्यात वाद सुरू होता. मनोज माडजे हा पवनचक्कीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करत असताना गस्तीवर असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) प्रकाश राठोड आणि चालक पोहेकॉ जाधव तिथे पोहोचले.
पोलिसांनी मनोज माडजे याला समज देण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने पोलिसांना हुज्जत घालत, “तू कसला पोलीस, मला ओळखत नाही का?” असे म्हणत एका पोलिसांच्या डोक्यातील टोपी फेकून दिली आणि त्यांच्या जर्किंगला पकडून दोन्ही हातांनी ओढले.
नोकरी घालवण्याची धमकी
पोलिसांना शिवीगाळ करत मनोज माडजे याने राजकीय वशिल्याचा वापर केला. त्याने, “मी आमदार राणापाटील यांचा पीए आहे. रितू खोकर आणि निलेश साहेबांना सांगून तुझी तुळजापुरात नोकरी कशी करतो ते बघतो, तुझी नोकरीच घालवतो,” अशी थेट धमकी दिली.
इतक्यावरच न थांबता, पोलीस उपस्थित असतानाही त्याने पवनचक्की कर्मचाऱ्यांना पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर नाईट ऑफिसर पोउपनि थोटे यांना घटनेची माहिती देऊन घटनास्थळी बोलावण्यात आले. स्थानिक लोकांच्या मदतीने वाद मिटवून पोलीस ठाण्यात परतले असता, मारहाण झालेले पवनचक्की कर्मचारी सुरेंद्र सिंग यांनी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणाची नोंद तुळजापूर पोलीस ठाण्याच्या दैनंदिनीत करण्यात आली आहे.






