कळंब – ॲक्टिव्हा स्कूटर विकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाला, त्याच्या मावशीला आणि भांडण सोडवण्यासाठी आलेल्या आईला शिवीगाळ करत दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना कळंब तालुक्यातील डिकसळ येथे घडली आहे. मारहाण करणाऱ्यांनी पीडित तरुणाच्या आईला जीवे मारण्याची धमकीही दिली. ही घटना बुधवारी (दि. ९ एप्रिल २०२५) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी दोघांविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम इंद्रजित पुरी (वय ३२ वर्षे, रा. शिराढोण रोड, डिकसळ, ता. कळंब) यांनी गुरुवारी (दि. १० एप्रिल २०२५) याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास डिकसळ येथील शिराढोण रोडवर आरोपी नामदेव भगवान गिरी आणि दिपक नामदेव गिरी (दोघे रा. शिराढोण रोड, डिकसळ) यांनी फिर्यादी शुभम व त्यांच्या मावशीला ॲक्टिव्हा स्कूटर विकण्याच्या कारणावरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि दोन्ही आरोपींनी शुभम व त्यांच्या मावशीला लाथाबुक्क्यांनी तसेच दगडाने मारहाण करून जखमी केले. हे भांडण सुरू असताना फिर्यादी शुभम यांची आई शामल पुरी या भांडण सोडवण्यासाठी पुढे आल्या. त्यावेळी आरोपी नामदेव गिरी आणि दिपक गिरी यांनी त्यांनाही शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
शुभम पुरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलिसांनी आरोपी नामदेव गिरी आणि दिपक गिरी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. स्कूटर विक्रीसारख्या किरकोळ कारणावरून झालेल्या या मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात चर्चा सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.