उमरगा : तालुक्यातील तुरोरी शिवारात एका ३५ वर्षीय तरुणाची अज्ञात हत्याराने मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विश्वंभर दौलप्पा दापेगावे (वय ३५, रा. थोरलेवाडी, ता. उमरगा) असे मयत तरुणाचे नाव आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज असून, याप्रकरणी उमरगा पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सायबाण्णा महादेव दापेगावे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मयत विश्वंभर दापेगावे यांचा आरोपी जगन्नाथ दामोदर सुर्यवंशी (रा. कोळसुर कल्याणी, ता. उमरगा) याच्यासोबत अज्ञात कारणावरून पूर्वी वाद झाला होता. याचाच राग मनात धरून आरोपी जगन्नाथ याने दि. ६ ऑक्टोबर रोजी रात्री १० ते दि. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० च्या दरम्यान विश्वंभर यांना तुरोरी शिवारातील बालाजी सहदेव जाधव यांच्या शेतातील गट नं २८/१ मधील गोठ्यात गाठले. तेथे आरोपीने अज्ञात हत्याराने विश्वंभर यांना जबर मारहाण केली, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादी सायबाण्णा दापेगावे यांच्या तक्रारीवरून आरोपी जगन्नाथ सुर्यवंशी याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.