मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचं आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू आहे. तर दुसरीकडे राज्यात जाळपोळीच्या घटना घडत आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत मराठेतर ओबीसी नेत्यांना लक्ष्य केल्याचं उघड होतंय.
मराठा आंदोलनाने राज्यात हिंसक वळण घेतल्यावर काहींनी थेट राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. यात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाहनावर करून त्याची मोडतोड करण्यात आली. तर बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक आणि वाहनांना आग लावण्यात आली होती. त्यानंतर बीडमध्येच आमदार संदीप क्षिरसागर यांच्या घराला तर जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयाला आग लावल्याच्या घटना समोर येत आहेत. त्याचबरोब ठाणे जिल्ह्यातील मुरबाडचे आमदार आणि ओबीसींचे नेते किसन कथोरे यांची गाडी ठाण्यात काहींनी अडवत आंदोलन केलं.
हे राजकीय नेते थेट मराठा समाजाशी संबंधित नसल्याने यांच्यावरच का हल्ले होत आहेत? असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय. त्याचबरोबर ओबीसी नेत्यांना लक्ष्य करण्यामागे मराठा – ओबीसी वाद पेटवला जाण्याबद्दलची चर्चाही सोशल मीडियावर रंगू लागली आहे. त्यामुळे स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्या मनात काय सुरू आहे? त्यांचं लक्ष्य नेमकं कोण? याबद्दल राजकीय क्षेत्रात सध्या कुजबूज होताना दिसते आहे.
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे – पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलतानाही सरकारला एकप्रकारे इशाराच दिलाय. यात ते म्हणतात की, “आता वेळ मागतायत तर इतके दिवस काय करत होते? मराठा समाजाला जाणून बुजून तापवलं जातंय. जे काही बोलायचं इथे येऊन बोला. तिकडून गप्पा मारू नका. आज संध्याकाळपासून मी पाणीच सोडणार आहे. मी उपोषण सोडणारच नाही. इथे येऊन बोला, इथे येताना तुमचं आमचे मराठे रक्षण करतील आणि नसाल येणार तर नका येऊ. मग काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या.”
मात्र, बीडमध्ये क्षिरसागर यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावर अखेर बोलताना मनोज जरांगे-पाटील यांनी भाष्य केलं की, “सत्ताधारी पक्षातील लोकच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरे जाळत आहेत. आणि शांततेच्या मराठा आंदोलनाला डाग लावण्याचा आणि चिघळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, आंदोलन शांततेत सुरू राहणार आहे. उद्रेक करण्याची काहाही गरज नाही. उद्रेक न करताही मराठा आरक्षण मिळवता येते.”