तुळजापूर – “मी कोणालाही शिवीगाळ केली नाही,” असा खुलासा प्रशांत उर्फ पिके कांबळे यांनी केला आहे.
प्रशांत कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मार्च रोजी सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान ते व त्यांचा मित्र धाराशिव रोडवरून जात असताना राजेंद्र दिगंबर माने व त्यांचा पोलीस गार्ड सोबत होते. यावेळी माने यांनी त्यांच्याशी जातीयवादी भाषा वापरून बोलण्यास सुरुवात केली. पोलीस गार्डला उद्देशून त्यांनी “हा तुळजापूरचा गुंड आहे, याला माज आला आहे” असे सांगत जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे.
यावेळी झालेल्या प्रकारानंतर प्रशांत कांबळे आणि त्यांचा मित्र तातडीने तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले. मात्र, त्यावेळी ठाणे अंमलदार भोसले आणि एका महिला अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी उडवाउडवीची भाषा केल्याचे कांबळे यांनी सांगितले. त्यांनी रात्री ९.३० च्या सुमारास तक्रार अर्ज दिला असला तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशीही माहिती त्यांनी दिली.
कांबळे यांनी पुढे सांगितले की, पोलीस गार्ड कोळी संपूर्ण घटनेचे चित्रीकरण करत होते. एवढेच नव्हे, तर त्यांनीच माझ्या मित्राला फोन लावून “तुझ्यावर गुन्हा दाखल होईल, जे काय आहे ते खरं सांग” असे सांगितल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले. यानंतर कांबळे यांचा मित्र म्हणाला की, “राजेंद्र माने यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली आहे.” मात्र, तरीही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे कांबळे यांनी म्हटले आहे.
याबाबत बोलताना कांबळे म्हणाले, “राजेंद्र माने यांनी पोलीस गार्डला चित्रीकरण करण्यास सांगितले आणि त्या गार्डने शूटिंग केले. तसेच, माने यांनी मला धमकी दिली की ‘तुला बघून घेतो.'”
या संपूर्ण घटनेमुळे तुळजापूर पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, पुढील तपासाची मागणी कांबळे यांनी केली आहे.