धाराशिव : शेतकऱ्यांना पिकासाठी आवश्यक असणाऱ्या खत, औषध व साधनसामुग्रीवर १८ ते २८ टक्के जीएसटी आकारला जात असल्याने शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना यातून दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात केली.
पुरवणी मागण्यांवर बोलताना आमदार पाटील म्हणाले की, कृषी विभागाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचे अनुदान २०१९ पासून दिलेले नाही. तसेच पंतप्रधान कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना यांचेही अनुदान दिले गेलेले नाही. “महाराष्ट्र आता थांबणार नाही” म्हणणाऱ्यांनी हे अनुदान का थांबवले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. डीबीटीसाठी दिल्या जाणाऱ्या पूर्वसंमती का थांबवल्या, याचेही उत्तर त्यांनी मागितले.
जीएसटी रद्द करा, द्राक्ष बागायतदारांना अनुदान द्या
शेतकऱ्यांना पिकासाठी लागणाऱ्या खत, औषध व साधनसामुग्रीवरील जीएसटी रद्द करावा. तसेच, सध्या द्राक्षबागाचे मोठे नुकसान झाले असून, त्यांनाही अनुदान देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. दुधाला अनुदान देण्याची घोषणा केली असली, तरी फॅट व एसएनएफची अव्यवहार्य अट लावल्याने ९० टक्के दूध उत्पादक या अनुदानास पात्र ठरत नाहीत. त्यामुळे ती अट शिथिल केल्यास ९० टक्के दूध उत्पादकांना त्याचा लाभ मिळेल, असेही ते म्हणाले.
धनगर बांधवांसाठी निधीची मागणी
धनगर बांधवांसाठी राजे होळकर महामेष योजना लागू केली असून, त्यासाठी ९१ हजार अर्ज आले आहेत. त्यासाठी १८०० कोटी रुपयांची गरज आहे. मात्र, तरतूद फक्त २९ कोटी रुपये करण्यात आली आहे. वडगाव एमआयडीसीसाठी २०१३ साली जमिनीचे भूसंपादन करण्यात आले असून, अकरा वर्षे होऊनही अद्याप शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही, असे सांगून आमदार पाटील यांनी या प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
क्रीडा संकुल, रस्ते विकासाचा मुद्दाही उपस्थित
तालुका क्रीडा संकुलासाठी एमआयडीसीने जागा उपलब्ध करून दिली होती. पण, सरकारकडून याला स्थगिती देण्यात आली आहे. ती स्थगिती उठवून सुसज्ज व अद्ययावत क्रीडा संकुल उभे करावे, अशी मागणीही त्यांनी केली. रस्ते विकास आराखडा करण्याचे काम थांबलेले आहे. यात शेतकऱ्यांच्या जमिनी रजिस्ट्री करण्याचा नियम केल्याने अडचण निर्माण झाली आहे. त्याऐवजी शेतकऱ्यांकडून १०० रुपयांच्या स्टॅम्पवर संमती पत्र घेतल्यास ही समस्या सुटेल, असे सुचवले.
शेगाव-पंढरपूर हा रस्ता अर्धवट अवस्थेत असून, पाच वर्षांपासून या मार्गावरील मांजरा नदीवरील पुलाचे काम झालेले नाही. येरमाळा, कन्हेरवाडी येथेही काम झालेले नाही. या ठिकाणी लूटमार होत असून, हे काम लवकर पूर्ण करावे. या कामाचा कंत्राटदार पळून गेला असून, त्याची जमा असलेली अनामत रक्कम जप्त करून हे काम पूर्ण करावे, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.