धाराशिव विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षाचे विद्यमान आमदार कैलास पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पाटील हे धाराशिव मतदारसंघात गेल्या काही वर्षांपासून सक्रिय असून, त्यांच्या कार्यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी भव्य रॅलीद्वारे पाटील निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. या रॅलीत शेकडो कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी होण्याची शक्यता आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना, अर्जाबरोबर अनामत म्हणून १० हजार रुपयांची रक्कम भरावी लागते. विशेष बाब म्हणजे, शिवसेनेतील थोडसरवाडी येथील शाखा प्रमुख प्रदीप भारत लोमटे यांनी ही रक्कम कैलास पाटील यांना सुपूर्द केली आहे. लोमटे हे एक सामान्य शेतकरी असून, त्यांनी आपल्या कष्टाची पै-पै जमा करून ही रक्कम उभी केली आहे. त्यांच्या या सहकार्याने पाटील यांचे मन भारावून गेले आहे, आणि याबद्दल त्यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
आ. कैलास पाटील यांची फेसबुक पोस्ट:
“धन्यवाद तरी कसे मानू? नतमस्तक तुमच्यापुढे… शिवसेना पक्षातील आमचे सहकारी, थोडसरवाडी येथील शाखा प्रमुख श्री. प्रदीप भारत लोमटे, एक सामान्य शेतकरी… निसर्गाशी लढत पै-पै जमा केलेली… कुटुंबाचा गाडा ओढत त्यांनी पक्षासाठी, आपल्यासाठी दाखवलेल्या निष्ठेचे मोल कोणत्याही किमतीत करता येत नाही.
आज विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना, त्यांनी अनामत रक्कम भरण्यासाठी दिवसरात्र एक करून जमलेले १० हजार रुपये मला सुपूर्द केले. हे एक निष्ठावंत, सच्चा शिवसैनिकच करू शकतो. कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपल्या विचाराशी प्रामाणिक असलेले हे खरे बाळासाहेबांचे शिवसैनिक. कुठे फेडायचे ऋण या सगळ्या प्रेमाचे?
त्यांचे हे प्रेम, निष्ठा पाहून लढण्यासाठी हजार हत्तीचे बळ अंगी संचारले… आपल्या सर्वांच्या या स्नेहाचा मी कायम पाईक राहून, लढेन आणि प्रत्येक संकटावर मात करून तुमचा मार्ग सुकर करण्यासाठी प्रत्येक क्षण समर्पित करेन, हा शब्द मी आपल्या सर्वांना देतो.”
समर्थकांमध्ये विशेष उत्साह
प्रदीप लोमटे यांच्या कडून दिल्या गेलेल्या या मदतीने आ. पाटील यांच्या समर्थकांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला आहे. सामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि स्थानिक नेत्यांमध्ये या घटनेमुळे एक सकारात्मक संदेश पसरला आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.
आमदार कैलास पाटील यांची उमेदवारी आणि त्यांच्या कार्यप्रणालीबद्दल कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आत्मीयता आणि निष्ठा असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांचे समर्थक या निवडणुकीत त्यांना पुन्हा एकदा विजयी करून विधानसभेत पाठवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.