धाराशिव – धाराशिव शहरातील बायपास रोडला लागून असलेल्या सर्व्हिस रोड, नाली आणि पथदिव्यांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत आज शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. कामाचा निकृष्ट दर्जा आणि त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) च्या अधिकाऱ्यांना कामाचा दर्जा तात्काळ सुधारण्याच्या सक्त सूचना दिल्या.
शहरालगत असलेल्या पोदार स्कूल ते अभियांत्रिकी महाविद्यालय या मार्गावर दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोडचे काम सध्या सुरू आहे. हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असून मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत, रुग्णालये, मंगल कार्यालये, पेट्रोल पंप आणि शाळा या परिसरात आहेत. मात्र, सुरू असलेल्या कामांमध्ये नाल्यांची उंची अवाजवी वाढवण्यात आल्याने सर्व्हिस रोडवर येताना किंवा वळताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर तोडगा म्हणून नाल्यांची उंची रस्त्याच्या पातळीनुसार करून नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या.
यासोबतच, सर्व्हिस रोडच्या कडेला लावण्यात आलेले विद्युत खांबदेखील वेडेवाकडे उभारण्यात आले असून त्यामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर बाबींकडे लक्ष वेधत आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना विद्युत खांबांची स्थिती सुधारण्याचे निर्देश दिले.
“कामाचा दर्जा सुधारला नाही आणि नागरिकांची गैरसोय सुरूच राहिली तर गय केली जाणार नाही,” असा इशारा देत आमदार पाटील यांनी एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असेही ते म्हणाले. सर्व्हिस रोडच्या कामाबद्दल नागरिकांना काही तक्रारी असल्यास त्यांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही आमदार पाटील यांनी यावेळी केले.
या पाहणी दौऱ्यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव, युवासेना शहरप्रमुख रवी वाघमारे, प्रवीण कोकाटे, पंकज पाटील, उमेश राजेनिंबाळकर, ॲड. निलेश बारखेडे, राज निकम, महेश शेरकर, ऋषिकेश धाराशिवकर, ॲड. पवन इंगळे, प्रदीप साळुंके, अक्षय खळदकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.