धाराशिव – “कर्जमाफी करणार,” असा शब्द निवडणुकीच्या काळात देणारे सरकार आता ‘योग्य वेळ’ आणि ‘नियमां’च्या गोंधळात शेतकऱ्यांना गाफील ठेवत आहे, असा आरोप करत आमदार कैलास पाटील यांनी थेट सभागृहात मुख्यमंत्री यांना जाब विचारला. “योग्य वेळ म्हणजे काय? आणि कर्जमाफीचे नियम नेमके कोणते?” हे राज्यातील शेतकऱ्यांना स्पष्टपणे सांगावे, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.
विरोधी पक्षाच्या २९३ च्या प्रस्तावावर बोलताना आमदार पाटील म्हणाले की, नवीन सरकार सत्तेवर आल्यापासून आतापर्यंत एकूण १,२६९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ही अतिशय गंभीर बाब आहे. “या आत्महत्या का झाल्या, याचा सरकारने विचार केला आहे का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
“कर्ज नियमितपणे फेडणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा थकबाकीदारांनाच कर्जमाफीचा लाभ मिळत असल्याने, शेतकरी मुद्दाम कर्ज थकवतात,” असे सांगत त्यांनी यामुळे निर्माण होणाऱ्या गैरसमजांवर सरकारने प्रकाश टाकण्याची गरज व्यक्त केली. त्यांच्या जिल्ह्यात ६० टक्के शेतकरी थकीत आहेत, मग अजून किती टक्के शेतकरी थकीत होतील याची वाट सरकार पाहत आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
“शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कर्जमाफीची योग्य वेळ आणि नियम एकदाचा स्पष्ट करा,” असे आवाहन करत आमदार कैलास पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.