नागपूर: राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना शिवसेना (ठाकरे गट) आमदार कैलास पाटील यांनी तुळजापूर येथील गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणाचा मुद्दा उचलून धरत विधानभवन दणाणून सोडले. या प्रकरणात मुख्य आरोपी मोकाट का? आणि पोलिसांची भूमिका संशयास्पद का? असे सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारला जाब विचारला.
तीर्थक्षेत्राच्या बदनामीवर चिंता
तुळजापूर हे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. मात्र, काही ठराविक समाजकंटकांमुळे आणि फोफावलेल्या ड्रग्ज व्यवसायामुळे या पवित्र शहराची आणि तीर्थक्षेत्राची बदनामी होत असल्याची खंत आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केली. सन्माननीय मुख्यमंत्री नेहमी ड्रग्जच्या बाबतीत ‘झिरो टॉलरन्स’ची (Zero Tolerance) भूमिका मांडतात, मग तुळजापूरच्या बाबतीत हा न्याय का लावला जात नाही, असा खोचक सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
‘अग्रवाल’ला अटक का नाही?
आपल्या भाषणात आमदार पाटलांनी पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात ‘अग्रवाल’ नावाचा मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे, तरीही पोलीस त्याला अद्याप अटक का करत नाहीत? त्याला नक्की कोणाचे अभय आहे?” या ड्रग्ज माफियाला मिळणारे राजकीय संरक्षण आणि पोलिसांची बघ्याची भूमिका याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
पत्रकारांवर दबाव आणि लीक झालेले उत्तर
या प्रकरणाची व्याप्ती मांडताना त्यांनी माध्यमांच्या स्वातंत्र्याचा मुद्दाही उपस्थित केला. या संवेदनशील विषयावर बातम्या देणाऱ्या पत्रकारांवर आणि माध्यमांवर दबाव टाकला जात असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला.
तसेच, मागील अधिवेशनात यावर लक्षवेधी मांडली असता, त्याचे उत्तर सभागृहात येण्यापूर्वीच लीक झाल्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दुसरे अधिवेशन उजाडले तरी त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे पाटलांनी निदर्शनास आणून दिले.
ड्रग्ज माफियांना मिळणारे राजकीय पाठबळ आणि सत्य मांडणाऱ्यांचा दाबला जाणारा आवाज, यावर सरकारने तातडीने उत्तर द्यावे, अशी मागणी कैलास पाटील यांनी लावून धरल्याने तुळजापूर ड्रग्ज प्रकरण पुन्हा एकदा रडारवर आले आहे.







