धाराशिव – विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी असतानाही शिक्षण सम्राट व शिवसेना (एकनाथ शिंदे गट) संघटक सुधीर पाटील यांनी मतदान केंद्रात मोबाईल नेऊन नियमभंग केला. त्यांनी मतदान करतानाचा व्हिडीओ शूट करून तो समाजमाध्यमांवर रील स्वरूपात व्हायरल केला. या प्रकरणी तब्बल सव्वा महिन्यानंतर आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले होते. त्या दिवशी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, मतदान केंद्र आणि त्याच्या १०० मीटर परिसरात मोबाईल नेण्यास बंदी होती. मात्र, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी भोसले हायस्कूलमधील खोली क्रमांक ६ च्या मतदान केंद्रात पत्नी आणि मुलासोबत मतदान करताना मोबाईल नेला. यावेळी त्यांनी एका व्यक्तीला व्हिडिओ शूटिंग करण्यास सांगितले. हा व्हिडिओ नंतर रील स्वरूपात समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आला.
या प्रकारावर धाराशिव लाइव्हने प्रश्न उपस्थित केला की, “सामान्य नागरिकांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी असताना, सुधीर पाटील यांना ही परवानगी का?” या बातमीनंतर हा मुद्दा चर्चेत आला आणि याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याची दखल घेत पाटील यांना नोटीस बजावली होती.
या घटनेच्या अनुषंगाने मतदान केंद्र अधिकारी कालिदास कुलकर्णी यांनी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे भारतीय दंड संहिता कलम २२३ (अ) अंतर्गत २५ डिसेंबर रोजी पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास तब्बल सव्वा महिना उशीर झाल्याने विविध स्तरांवर आश्चर्य व्यक्त होत आहे. नियमभंग झाल्याचे पुरावे उपलब्ध असूनही कारवाईसाठी एवढा विलंब का झाला, यावर नागरिक प्रश्न विचारत आहेत. या विलंबामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही शंका उपस्थित केली जात आहे.