धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून, गेल्या दोन-तीन दिवसांत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तीन मोटारसायकली चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कळंब तहसील कार्यालय परिसर, नळदुर्ग हद्दीतील अणदूर आणि बेंबळी हद्दीतील ताकविकी येथून या चोऱ्या झाल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,
-
नळदुर्ग : फिर्यादी शरणबसू मल्लाण्णा पाटील (वय ३३ वर्षे, रा. प्लॉट ९८, सरवदे नगर, ता. उत्तर सोलापूर) यांची एमएच १३ बी.टी. ८४१७ क्रमांकाची, अंदाजे ३०,००० रुपये किमतीची मोटारसायकल २२ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अणदूर येथील खंडोबा मंदिरासमोरून अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. याप्रकरणी २४ एप्रिल रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
-
कळंब : फिर्यादी श्रीहरी पंढरी पायाळ (वय ४३ वर्षे, रा. सापनाई, ता. कळंब) यांची एमएच २५ ए.एफ. ३५०४ क्रमांकाची, हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची, अंदाजे २०,००० रुपये किमतीची मोटारसायकल २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११:०० ते ११:३० च्या दरम्यान कळंब येथील तहसील कार्यालय परिसरातून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याबाबत २४ एप्रिल रोजी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.
-
बेंबळी : फिर्यादी विवेक नेताजी पेठे (वय २४ वर्षे, रा. गावसुद, ता. जि. धाराशिव) यांची अंदाजे ५२,००० रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा शाईन मोटारसायकल २४ एप्रिल २०२५ रोजी पहाटे २:३० ते ४:०० च्या दरम्यान बेंबळी हद्दीतील ताकविकी येथे नासेरखॉ पठाण यांच्या घरासमोरून अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. याबाबतची फिर्याद २४ एप्रिल रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात देण्यात आली.
या तिन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांनी फिर्यादींच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये चोरीचे गुन्हे नोंदवले आहेत. जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. तिन्ही घटनांमध्ये मिळून अंदाजे १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.