लोहारा – उमरगा-लोहारा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण स्वामी यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गद्दार आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. या सभेत निंबाळकर यांनी चौगुले यांच्या भूमिकेबद्दल खंत व्यक्त करत मतदारांना त्यांच्या ‘गद्दारी’ची आठवण करून देत ठणकावून आवाहन केले.
निंबाळकर म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी उमरगा-लोहारा मतदारसंघातून तीन वेळा चौगुले यांना उमेदवारी दिली. २००९ मध्ये त्यांनी निवडणूक जिंकल्यानंतर या भागातील जनतेने एकत्र येऊन त्यांना गाडी खरेदीसाठी आर्थिक मदत दिली होती. मात्र, या विश्वासाला तडा देत चौगुले यांनी उद्धव ठाकरे यांच्या बरोबर गद्दारी केली. जनतेच्या पाठिंब्याचा आणि उद्धव साहेबांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत त्यांनी मिंधे गटात प्रवेश केला, आणि त्याबदल्यात ५० खोके घेतले. हे एक विश्वासघात असून जनतेने अशा गद्दारांना धडा शिकवला पाहिजे.”
सभेत महायुतीच्या सरकारवर ताशेरे ओढताना निंबाळकर म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत लोकांनी या सरकारला दणका दिला आहे. त्यातून हे घाबरले असून आता त्यांनी ‘लाडकी बहीण योजना’ आणली आहे. परंतु हे स्पष्ट आहे की ही योजना जनतेसाठी नसून स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी आहे. हे ‘लाडकी बहीण’ नसून ‘लाडकी खुर्ची योजना’ आहे, याचा जनतेनेही उलगडा केला आहे.”
ओमराजे निंबाळकर यांनी मतदारांना आवाहन करत असेही सांगितले की, “उमरगा-लोहारा तालुक्यातील जनता सुज्ञ आणि सजग आहे. त्यांनी गद्दारी करणाऱ्या चौगुले यांना जागा दाखवावी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण स्वामी यांना निवडून द्यावे. हा फक्त निवडणूक विजय नसून या गद्दारांवर जनतेचा रोष असलेली ठोस प्रतिक्रिया असेल.”