धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी डोके वर काढले असून, २४ आणि २५ मे रोजी विविध ठिकाणी झालेल्या चोऱ्यांमध्ये लाखोंचा मुद्देमाल लंपास झाला आहे. याप्रकरणी उमरगा, कळंब, ढोकी आणि येरमाळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उमरग्यात हार्डवेअर दुकानाला दरोडा, ७० हजारांचा माल लंपास
उमरगा शहरातील साईधाम कॉलनी येथील स्वामी हार्डवेअर दुकानाच्या पाठीमागील पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. ही घटना २४ मे रोजी रात्री ८ ते २५ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. चोरट्यांनी दुकानातून १३ नग ग्लॅडर मशीन, १२ बंडल पितळी शिंगोटी, १६ नग बर्गर पेंट (१ लिटर) आणि १६ नग बर्गर पेंट (अर्धा लिटर) असा एकूण ६९,९६० रुपये किमतीचा माल चोरून नेला. याप्रकरणी दुकान मालक शिवलिंग बसाप्पा स्वामी (वय ४९) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३४(१) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कळंबमध्ये अभिराज ट्रेडर्समधून डिव्हिआर आणि राउटरची चोरी
कळंब शहरातील कृष्णा हॉस्पिटलसमोरील अभिराज ट्रेडर्स या दुकानाच्या शटर व स्लॅबच्या मधल्या लोखंडी अँगलच्या ग्रीलच्या मोकळ्या जागेतून अज्ञात व्यक्तीने आत प्रवेश करून चोरी केली. ही घटना २४ मे रोजी सायंकाळी ७.३० ते २५ मे रोजी सकाळी ९.३० वाजेच्या दरम्यान घडली. चोरट्यांनी दुकानातील एक डिव्हिआर आणि मोडेम राउटर असा एकूण ११,४३३ रुपये किमतीचा माल चोरून नेला. याप्रकरणी अशोक भारत मुंडे (वय ३९, रा. गोविंदपूर, ता. कळंब) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३४(१) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ढोकीत शेतातून मोटारसायकल आणि मोबाईल लंपास
ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुई ढोकी येथील शेत गट क्रमांक ४४ मधून अज्ञात चोरट्याने एक मोटारसायकल आणि मोबाईल फोन चोरून नेल्याची घटना २५ मे रोजी पहाटे १ ते ३ वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये अविनाश अशोक गायकवाड (वय २५, रा. रुई ढोकी) यांची अंदाजे ६०,००० रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल (क्र. एमएच २५ बीडी ५५१७) आणि ५,००० रुपये किमतीचा ओपो २१ प्रो कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण ६५,००० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. अविनाश गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
येरमाळ्याजवळ प्रवासादरम्यान वाहनाच्या कॅरिअरवरून बॅगांची चोरी
दिल्लीहून केरळला कुटुंबासोबत प्रवास करत असलेल्या मेलबीन मॅथ्यू (वय ४५, रा. दिल्ली) यांच्या वाहनाच्या कॅरिअरवरून अज्ञात व्यक्तीने बॅगा चोरून नेल्या. ही घटना २५ मे रोजी पहाटे ५.१५ ते ६ वाजेच्या सुमारास पारगाव ते वडगाव (ज.) दरम्यान एनएच ५२ रोडवर घडली. चोरट्यांनी मेलबीन मॅथ्यू यांच्या डीएल ०१ व्हीसी ५४४६ या क्रमांकाच्या वाहनाच्या कॅरिअरवर ठेवलेल्या वेगवेगळ्या रंगांच्या व कंपन्यांच्या १४ बॅगा चोरल्या. या बॅगांमध्ये महत्त्वाची प्रमाणपत्रे, कपडे आणि दागिने असा एकूण ४०,००० रुपयांचा मुद्देमाल होता. याप्रकरणी मेलबीन मॅथ्यू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्व प्रकरणांमध्ये पोलीस अधिक तपास करत असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. जिल्ह्यात एकाच दिवशी चोरीच्या अनेक घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.