महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे अचानक सक्रिय झाले आहेत. राज्यातील टोलचा प्रश्न त्यांनी पुन्हा हाती घेतला आहे. यापूर्वी मुंबई एन्ट्री पॉईंट सोडून राज्यभरातील छोटे टोलनाके छोट्या वाहनांसाठी तत्कालीन फडणवीस सरकारने टोलमुक्त केले होते. याचे श्रेय भाजपने घेतलेच पण ही टोलमुक्ती आपल्यामुळे झाली असा दावा राज ठाकरे अद्यापही करत आहेत. विशेष म्हणजे मुंबई एन्ट्री पॉइंटवर राज ठाकरे यांनी आपले मनसे चे सैनिक बसवून वाहनांची मोजणी केली होती. पुढे या मोजणीचे काय झाले ?हे राज ठाकरे यांना आणि सरकारलाच माहित. मात्र या टोलमुक्ती आंदोलनाचा राज ठाकरे यांना पुढील कोणत्याही निवडणुकीत फायदा झाला नाही.
राज ठाकरे यांनी नव्याने हा प्रश्न हाती घेतल्यामुळे घेतल्यामुळे सरकारलाही जाग आली आहे. त्यामुळे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले मंत्री दादा भुसे यांना राज ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी थेट ‘ राजगडा’ वर पाठवले. मात्र अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. ठाणे जिल्ह्यातील वाहनांना वाहनांना मुंबई एन्ट्री पॉइंटवर टोल मुक्ती मिळेल अशी चर्चा होती मात्र ही चर्चा हवेतच राहिली. ‘ शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ‘ या उद्देशाने भाजप आणि शिंदे सेनेने सध्या राज ठाकरे यांना जवळ केले आहे. यापूर्वी शिवसेना एक संघ असताना शिवसेना भाजप युतीचे सरकार सत्तेत असताना राज ठाकरे यांनी ‘ लावरे तो व्हिडिओ ‘ ही टॅग लाईन घेऊन भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात प्रचार सभा सुरू केल्या होत्या मात्र इडी चे बोलावणे येताच राज ठाकरे यांच्या त्या सभा बंद झाल्या होत्या.
राज ठाकरे यांचे टोलमुक्तीचे आंदोलन तापवून मुंबई एन्ट्री पॉइंट वरील टोल छोट्या वाहनांसाठी मुक्त करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.पण याचा निवडणुकीत कितपत फायदा होईल? याची चाचपणी सत्ताधारी भाजप कडून सुरू आहे.
उद्धव ठाकरेंचे नवे शिवसेना नेते
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निम्मी शिवसेना भाजपच्या दावणीला बांधल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांना निष्ठावंतांची आठवण आली आहे. ज्या निष्ठावंतांना एकनाथ शिंदे यांच्या प्रेमापोटी दूर केले होते त्यांना आता शिवसेना नेते पदाची संधी देण्यात आली आहे. ठाकरे कुटुंबीयांचे लाडके आणि जोगेश्वरी चे आमदार रवींद्र वायकर यांना शिवसेना नेते पदाची संधी मिळाली आहे. भाजप शिवसेना मंत्रिमंडळात रवींद्र वायकर हे राज्यमंत्री होते. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री होते. परंतु महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा एकनाथ शिंदे यांचे महत्त्व वाढले होते. रवींद्र वायकर यांना साधे मंत्रिपद ही मिळाले नव्हते. तरीसुद्धा ते एकनाथ शिंदे सोबत न जाता मूळ शिवसेनेत राहिले.तळागाळात संपर्क असलेल्या वायकर यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.
गजानन कीर्तिकर यांचे पीए म्हणून आपली कारकीर्द सुरू करणारे सुनील प्रभू यांची सुद्धा नेतेपदावर वर्णी लागली आहे. कीर्तीकर यांना नेतेपद मिळवण्यासाठी उभी हयात घालावी लागली परंतु त्यांचे पीए म्हणून कारकिर्द सुरू करणाऱ्या सुनील प्रभू यांना महापौर,आमदार,नेते आदी पदे सहज मिळाली.तत्कालीन विभागप्रमुख विनोद घोसाळकर यांचा विरोध डावलून गजानन किर्तीकर यांनी सुनील प्रभू यांना नगरसेवक पदाचे तिकीट मिळवून दिले.आता ते घोसाळकर उपनेते आहेत आणि सुनील प्रभू नेते झाले.असा नियतीचा खेळ असतो.
अनिल परब यांनाही निष्ठेचे फळ मिळाले आहे.विधिमंडळातील लढाई सुप्रीम कोर्टापर्यंत ते यशस्वीपणे लढत आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी एकहाती लढणारे आनंद दिघे यांचे पट्टशिष्य राजन विचारे यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.मातोश्री वर एकनाथ शिंदे यांचा शब्द प्रमाण मानला जात असताना राजन विचारे शांत बसले.बंडखोरी करण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही.त्यांच्या नेते पदामुळे आता ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेला खऱ्या अर्थाने बळ येईल.
अनिल देसाई आणि विनायक राऊत यांच्यापेक्षा कुणीच शिवसेनेत ‘ निष्ठावान’ नाहीत.
नवीन नेत्यांची ,उपनेत्यांची यादी पाहून शिवसेनेचा एकमेव नेता मराठवाड्यातील आहे.दुसरे भास्कर जाधव कोकणातील आहेत.मात्र उत्तर महाराष्ट्र,पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र आदी प्रांतात शिवसैनिक नाहीत का? पक्षाचे अस्तित्व आहे का? हा प्रश्न पडतो.
समाजवादी साथी गाती……
जनता दल युनायटेड चे नेते कपिल पाटील यांनी पुढाकार घेऊन समाजवादी विचारांच्या २१ संघटना एकत्र आणून उध्दव ठाकरे यांच्याशी एक बैठक घेतली.या बैठकीत उध्दव ठाकरे यांनी वारसा सांगत एकत्र येण्याचे आवाहन केले.पण उद्या सत्ता आल्यानंतर उध्दव ठाकरे कसे वागतात? हे शेकाप चे जयंत भाई पाटील यांना जरा समाजवादी साथी नी विचारावे.
कपिल पाटील हे स्वतःच्या स्वार्थासाठी या बैठका आयोजित करत आहेत,अशी टीका त्यांचे विरोधक करत आहेत.पण कपिल पाटील यांनी स्वार्थ साधला तर आक्षेप घेण्याचे कारण काय? ते राजकीय पक्ष चालवतात,धर्मादाय संस्था नव्हे? उध्दव ठाकरे हे स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय कुणाला भेटत ही नाहीत.ते थेट बैठकीला आले.
– नितीन सावंत
9892514124