धाराशिव – स्वत:ला शेतकऱ्यांचे कैवारी समजणाऱ्या राज्य शासनाने येत्या चार दिवसात सोयाबीन हमी भावाने खरेदी केंद्र चालु करावीत, अन्यथा या विरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दुधगावकर यांनी म्हटले आहे की, यावर्षी अत्यल्प पावसाने सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये ६० ते ७० टक्के घट आलेली आहे. त्यातच आलेल्या सोयाबीनला व्यापारी अत्यंत कमी दराने अंदाजे ४२०० ते ४४०० रुपयामध्ये खरेदी करत आहेत. सोयाबीन हे जिल्ह्यातील नगदी पीक असून या पिकावरच शेतकºयाचा वर्षाचा खर्च भागणार आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन एकरी काढणी, मोडणी व खळ करणे यासाठी १५ हजार रुपये एवढा पेरणीनंतर खर्च होत आहे. यातच सदर सोयाबील खरेदी करताना व्यापारी सोयाबीन लहान आहे, तेलाचे प्रमाण कमी आहे, सोयाबीन ओले आहे, सोयाबीनमध्ये काडी-कचरा आहे, अशी विविध कारणे सांगत आहेत. नैसर्गीक आपत्तीने शेतकरी आर्थीक अडचणी आलेला असताना कमी भावाने सोयाबीन विकले जात असल्यामुळे शेतकरी धास्तावला असून शेतकऱ्याची मानसिकता बिघडलेली आहे.
त्यासाठी स्वत:ला शेतकऱ्यांचे कैवारी समजणाऱ्या राज्य शासनाने येत्या चार दिवसात सोयाबीन हमी भावाने खरेदी केंद्र चालु करावीत अन्यथा या विरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दुधगावकर यांनी दिला आहे.