धाराशिव – येथील विनोद गौतम आंबेवाडीकर यांनी महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ अंतर्गत बांधकाम परवान्यातील नियम व अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुख्याधिकारी वसुधा फड यांनी दिला आहे.
नगर परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, आंबेवाडीकर यांनी धाराशिव येथील सर्वे नंबर २०/४ मधील भुखंड क्रमांक १९ या जागेवर अनाधिकृत बांधकाम केले होते. याबाबत सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी नगर परिषदेकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत नगर परिषदेने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली. चौकशीअंती, आंबेवाडीकर यांनी नगर परिषदेकडून बांधकाम परवानगी न घेता बांधकाम केल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी नगर परिषदेने आंबेवाडीकर यांना अधिकृत नोटीस बजावून अनाधिकृत बांधकाक काढून टाकण्याची नोटीस दिली होती. परंतु, . आंबेवाडीकर यांनी या नोटीशीकडे दुर्लक्ष करून नोटीसचे पालन केले नाही. त्यामुळे, महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ कलम ५६ (६) (अ) अन्वये त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यासंदर्भात नगर परिषदेच्या रचना सहाय्यक सचिन राजेंद्र गुंजाळ यांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन याची माहिती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संबंधित शहर पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे.
विनोद गौतम आंबेवाडीकर हे भोसले ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. ते उच्चशिक्षित असूनही अनधिकृत बांधकाम करून, कायदा धुळीला मिळवला आहे.
या घटनेमुळे अनाधिकृत बांधकामाविरोधात नगर परिषद कठोर कारवाई करण्याच्या भूमिकेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, बांधकाम परवान्यातील नियम व अटींचे पालन करणे किती आवश्यक आहे याची जाणीव नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.