मुरूम – स्वातंत्र्याला ७७ वर्षे उलटून गेली तरी मुरूम ते आलूर गाडीवाट रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना अजूनही चिखलातून पायपीट करावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.
पावसाळ्यात तर ही परिस्थिती अधिकच बिकट होते. शेतीला जाणे-येणे अशक्य होते. बैलगाडी किंवा ट्रॅक्टर देखील या चिखलातून जाऊ शकत नाही. त्यामुळे शेतीचे उत्पन्न गावात आणण्यास अडचणी येतात. शेतकऱ्यांना पिकांचे मोठे नुकसान सहन करावे लागते.
या रस्त्याच्या समस्येकडे तत्कालीन आणि विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. तीन वेळा आमदारकी मिळवूनही चौगुले यांनी या रस्त्याकडे लक्ष दिले नाही, याबद्दल शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
आता शेतकऱ्यांनी निवडणुकीत हिसका दाखविण्याचा इशारा दिला आहे. रस्त्याचा प्रश्न सोडवणाऱ्या उमेदवारालाच मतदान करण्याचा त्यांचा निर्धार आहे.
या रस्त्याअभावी शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणापासून ते आरोग्यापर्यंत सर्वच गोष्टींवर याचा विपरीत परिणाम होत आहे.
सरकारने याकडे तातडीने लक्ष घालून मुरूम ते आलूर गाडीरस्ता बांधून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.