मुरुम : मागील भांडणाचा राग मनात धरून एका ४५ वर्षीय व्यक्तीला काठी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी (दि. २८) सायंकाळी मुरुम शहरातील बसस्थानकासमोर घडली. याप्रकरणी पीडित व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून मुरुम पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तानाजी पांडुरंग सुसलादे (वय ४५ वर्षे, रा. सुंदरवाडी, ता. उमरगा) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ते मुरुम बसस्थानकासमोर असताना आरोपी बबलू अदम शेख (रा. सुंदरवाडी, ह.मु. मुरुम) आणि त्याच्या एका साथीदाराने त्यांना अडवले.
जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी तानाजी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्यांनी, काठीने आणि लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. तसेच, “तुला जिवंत सोडणार नाही” अशी जीवे मारण्याची धमकीही दिली.
घटनेनंतर तानाजी सुसलादे यांनी तातडीने मुरुम पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बबलू शेख व त्याच्या अनोळखी साथीदाराविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१ (२)(३), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मुरुम पोलीस करत आहेत.