मुरूम – मुरूम नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक आता अत्यंत रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. भारतीय जनता पार्टीकडून (भाजप) एकाच पदासाठी तब्बल तीन प्रमुख इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पक्षात मोठा गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके कुणावर विश्वास टाकतात आणि कुणाला अधिकृत उमेदवारी देतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणाची सुरुवात आज झाली, जेव्हा जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान अध्यक्ष बापुराव पाटील यांनी मोठ्या शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. “मीच भाजपचा अधिकृत उमेदवार आहे,” हे दाखवून देण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला.
मात्र, त्यांच्या पाठोपाठ काही क्षणातच एक अनपेक्षित घडामोड घडली. पूर्वी काँग्रेसच्या पाठिंब्यावर नगराध्यक्ष राहिलेले धनराज मंगरुळे यांनीही थेट ‘भाजप’ कडूनच नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
हा गोंधळ इथेच थांबला नाही. काल गुरुवारीच, भारतीय जनता पार्टीचे एक सक्रिय पदाधिकारी म्हणून ओळखले जाणारे श्रीकांत मिणियार यांनी देखील भाजपचाच उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला आहे.
एकाच पदासाठी भाजपकडून तीन-तीन मातब्बर उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे मुरूममधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आणखीही काहीजण भाजपच्या नावाने अर्ज दाखल करतील, अशी चर्चा सुरू आहे.
आता या तिन्ही उमेदवारांपैकी पक्षाचा अधिकृत ‘एबी फॉर्म’ कुणाला मिळणार, पक्षश्रेष्ठी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार आणि अखेरीस कोण माघार घेणार, यावरच सर्व राजकीय गणित अवलंबून आहे. या तिघांपैकी मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास कोण संपादन करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






