उमरगा – तालुक्यात बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांवर मुरूम पोलिसांनी कारवाई केली आहे. शुक्रवारी सायंकाळी अक्कलकोट रस्त्यावर पेट्रोल पंपाजवळ हायवा टिप्पर पकडण्यात आला. या प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून १० लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, वाहन मालक आणि वाळू मालकाविरुद्ध गुन्हा दाखल न झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.
मळगी येथील दिलीप तात्याराव सूर्यवंशी या चालकाने के ए २८ बी ५२८९ या क्रमांकाच्या हायवा वाहनातून बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक केल्याप्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरूम परिसर कर्नाटक सीमेजवळ असल्याने या भागातून मोठ्या प्रमाणात वाळूची चोरटी वाहतूक होते. ही वाळू चौपट दराने विकली जाते. या व्यवसायातून अनेकांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळवला आहे. वाळू तस्करी रोखण्यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने ही समस्या वाढत आहे.
‘हनीफ’ नावाचा एक वाळू माफिया उमरगा, लोहारा, नळदुर्ग परिसरात वाळूची चोरटी वाहतूक करतो. त्याचे काही राजकीय पुढारी, नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संबंध असल्यामुळे त्याला कोणताही अडथळा येत नाही. पोलिसांकडून कारवाई झाल्यास ती केवळ वाहन चालकापुरती मर्यादित राहते, वाळू माफियावर मात्र कोणतीही कारवाई होत नाही. यामुळे या माफियांची हिम्मत वाढत चालली आहे.