मुरुम : शेतातील फळबागेला अज्ञातांकडून नव्हे, तर ओळखीच्याच व्यक्तींनी आग लावून तब्बल २३० फळझाडे आणि शेती साहित्याचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान केल्याचा धक्कादायक प्रकार उमरगा तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी येणेगूर येथील शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून मुरुम पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रताप संपणप्पा लामजने (वय ६०, रा. येणेगूर, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांचे गणेशनगर, डिकसळ येथे शेत गट क्रमांक १२५ आहे. या शेतात त्यांनी विविध फळझाडांची मोठ्या कष्टाने लागवड केली होती. शनिवारी (ता. २१) दुपारी पावणेपाच वाजेच्या सुमारास आरोपींनी त्यांच्या शेतात घुसून जाणीवपूर्वक आग लावली.
या भीषण आगीत बागेतील आंब्याची १२५ झाडे, लिंबाची ६० झाडे, शेवग्याची २५ झाडे, पपईची १५ झाडे, फणसाची २, चिकूची २ आणि मोसंबीचे १ अशी एकूण २३० झाडे जळून खाक झाली. केवळ झाडांचेच नुकसान झाले नाही, तर शेतात अंथरलेला मल्चिंग पेपर (सीट), ठिबक सिंचन पाईपलाईन आणि सुरक्षेसाठी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे असा एकूण २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जळून नष्ट झाला आहे.
याप्रकरणी प्रताप लामजने यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून मुरुम पोलिस ठाण्यात आरोपी श्रद्धानंद गुणवंत लामजणे, पुतळाबाई गुणवंत लामजणे आणि गजानन गुणवंत लामजणे (सर्व रा. सुपतगाव, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांच्यावर भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ३२४ (५) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच आडनावाचे आरोपी आणि फिर्यादी असल्याने हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडला असावा, असा प्राथमिक अंदाज असून मुरुम पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.




