मुरूम – येथील डॉ. झाकीर हुसेन उर्दू शाळेच्या मुख्याध्यापकांना एका तथाकथित धर्मगुरूने मुलींना १५ ऑगस्ट व इतर कार्यक्रमांत नृत्य करू देऊ नये, असा तालिबानी फतवा व्हॉट्सअॅपवर पाठवल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुख्याध्यापकांनी मुरूम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, रियाज इसाक अत्तार नावाच्या धर्मगुरूने मुख्याध्यापकांच्या व्हॉट्सअॅपवर मुलींच्या नृत्याला विरोध करणारा आणि त्यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणारा एक संदेश पाठवला होता. या संदेशात मुलींचा सन्मान धोक्यात येऊ शकतो, असा इशारा देण्यात आला होता. तथापि, काही वेळातच हा संदेश हटवण्यात आला.
या घटनेनंतर मुख्याध्यापकांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि अत्तार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अत्तार यांना नोटीस बजावली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.