धाराशिव – शहरातील रस्ते विकासासाठी मंजूर असलेल्या १४० कोटींच्या कामांना आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील अंतर्गत वादामुळे स्थगिती मिळाली आहे. या राजकीय कुरघोडीमुळे शहरातील नागरिकांना विकासापासून वंचित राहावे लागत असून, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या कामांवरील स्थगिती तत्काळ उठवून ती सुरू करावीत, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने गुरुवारी (३० ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘रास्तारोको’ आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी राज्य सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘भाजपा / फडणवीस सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय’, ‘शहरातील विकास कामे अडविणाऱ्या भाजपा सरकारचा धिक्कार असो’, ‘महाविकास आघाडीचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलकांच्या हातात राज्य सरकार विरोधी, स्थगिती उठवण्यासंदर्भातील आणि आमदार राणा पाटील यांच्या विरोधातील घोषणांचे फलक झळकत होते. आंदोलनानंतर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
दीड वर्षांपासून कामे ठप्प
महाविकास आघाडीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी नगरोत्थान अभियान अंतर्गत १४० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या कामांना २३ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. नियमतः प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर सात दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू करणे व तीन महिन्यांत कार्यारंभ आदेश देणे बंधनकारक असताना, दीड वर्ष उलटूनही कामांना सुरुवात झालेली नाही.
नेत्यांच्या कुरघोडीचा फटका
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधी खर्चात अनियमितता झाल्याची तक्रार करून निधी खर्चाला स्थगिती आणली. तर दुसरीकडे, रस्त्यांच्या कामांचे कार्यारंभ आदेश दिल्यानंतर त्यात अनियमितता असल्याचे कारण देत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकरवी या कामांना स्थगिती आणली. जिल्ह्यातील महायुतीच्या या दोन प्रमुख नेत्यांमधील अंतर्गत राजकीय कुरघोडीमुळेच शहरातील विकासकामे ठप्प झाली असून, शहराचे वाटोळे होत असल्याचा घणाघाती आरोप महाविकास आघाडीने केला आहे.
यापूर्वीही झाले होते उपोषण
या रखडलेल्या कामांसंदर्भात महाविकास आघाडीने यापूर्वीही अनेक निवेदने दिली होती. २८ एप्रिल २०२५ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणही सुरू करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ३० एप्रिल रोजी उपोषणस्थळी भेट देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले होते. मात्र, अद्यापही तोडगा न निघाल्याने मविआला पुन्हा रस्त्यावर उतरावे लागले.
खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त, तीव्र आंदोलनाचा इशारा
गेल्या दीड वर्षांपासून शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. या दोन नेत्यांच्या भांडणामुळे नागरिकांना खड्ड्यांमधून प्रवास करताना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत, तसेच अनेक नागरिक खड्ड्यांमुळे जायबंदी झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यांच्या कामांना दिलेली स्थगिती तत्काळ उठवून कामे सुरू करावीत, अन्यथा आगामी काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.






