नळदुर्ग – अनेक वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या नळदुर्ग – अक्कलकोट रस्ता दुरुस्तीच्या कामाची सुरुवात लवकरच होणार असून निविदा पुढील आठवड्यात निश्चित करण्यात येत असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. या रस्त्याचा प्रश्न धाराशिव लाइव्हने उचलून धरला होता, हे येथे उल्लेखनीय.
राष्ट्रीय महामार्ग ६५२ तुळजापूर – नळदुर्ग – अक्कलकोट या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापूरच्या माध्यमातून हाती घेण्यात आले होते. नळदुर्ग – अक्कलकोट या रस्त्यावरील काही भागातील शेतकऱ्यांनी जमिनीच्या मोबदल्याच्या विषयावरून विरोध दर्शवला होता. सद्यस्थितीत अशा ठिकाणचा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. यासाठी जिल्हाधिकारी, संबंधित विभागाचे अभियंता, शेतकरी व वकिलांबरोबर अनेक बैठका घेऊन सातत्याने पाठपुरावा चालू होता.
उच्च न्यायालयात हा विषय गेल्यानंतर आ. राणाजगजितसिंहजी पाटील यांनी जुन्या रस्त्याच्या दुरुस्तीचा मार्ग सुचविला होता. अधिकची जागा व त्याचा मोबदला हा विषय स्वतंत्र ठेवून अनेक वर्षांपासून वापरात असलेल्या रस्त्याची उपलब्ध रुंदी कायम करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यास उच्च न्यायालयाने मान्यता दिली होती. त्या अनुषंगाने निविदा प्रक्रिया सुरु असून 10.80 किमी. लांबीच्या रस्त्यासाठी रु. 3,91,71,811 किमतीच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे. निविदा 30 नोव्हेंबर पर्यंत भरण्यात आल्या असून पुढील आठवड्यात निविदा निश्चिती होत लवकरच कमाला सुरुवात होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेला हा विषय मार्गी लागल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.