धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोकरीच्या नावाने सुरू असलेल्या फसवणुकीने अनेक तरुणांचे स्वप्नं चक्काचूर केले. एकीकडे बेरोजगारीचा आगडोंब उसळलेला, तर दुसरीकडे नोकरीच्या आमिषाने लाखो रुपये लुटणारे दलाल सक्रीय! मोबाईल विक्रेता, गट शिक्षणाधिकारी मॅडमचा दिवटा चिरंजीव आणि थेट मोठ्या साहेबाचा मेहुणा – असा हा गुन्ह्याचा ‘गोल्डन ट्रॅंगल’ साखळीप्रमाणे चालू होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हे सर्व घडत होतं, म्हणजेच ‘खुद्द सरकार’च्या अंगणात लुटारू उभे होते!
पोलिसांचा संशयास्पद ‘तपास’ – गुन्हेगार की गेस्ट ऑफ ऑनर?
या प्रकरणात पोलिसांनी काय केलं? एका महिन्यापासून “तपास सुरू आहे” हा मंत्र जपत राहिले. पण बातम्यांनी पेट घेताच, आता दोन दिवसांत गुन्हा दाखल करू अशी घोषणा झाली. आणि मग काय? सोमवारी सकाळी मुख्य आरोपी गट शिक्षणाधिकारीचा दिवटा चिरंजीव पोलीस ठाण्यात पोहोचला, पण गुन्हेगारासारखा नाही, तर सन्माननीय पाहुण्यासारखा! तपास अधिकाऱ्यांसोबत चहा घेत गप्पा ठोकत होता. हा गुन्हेगार आहे की पोलिसांचा जुना मित्र? गुन्हा दाखल करण्याऐवजी चहापाणी सुरू असतं, तेव्हा सामान्य नागरिकांना काय संदेश मिळतो?
फोटो, व्हिडीओ गायब – पुरावे नष्ट करण्याचा डाव!
धाराशिव लाइव्हमध्ये बातम्या येताच मुख्य आरोपीने सोशल मीडियावरून मोठ्या साहेबांसोबतचे फोटो, व्हिडीओ, रील्स हटवले. कारण हे फोटोच त्याचं ‘भांडवल’ होतं – मोठ्या साहेबाच्या ओळखीने नोकरी मिळते हा गैरसमज पसरवायचा, आणि पैसे उकळायचे! आता मात्र हेच पुरावे त्याच्या अंगलट येऊ शकतात हे लक्षात येताच, त्याने गुपचूप डिलीट करण्याचा मार्ग अवलंबला.
“आम्ही प्रतिष्ठित आहोत, गयावया करू नका!”
हा मोबाईल विक्रेता आता फसवणूक झालेल्या तरुणांना गप्प बसण्याची गळ घालत आहे. “आम्ही प्रतिष्ठित आहोत, आमची इज्जत घालवू नका,” अशी याचना करतोय. फसवणूक करणारे प्रतिष्ठित? आणि पैसे भरूनही हाताशी रिकाम्या नियुक्ती पत्राशिवाय बसलेले तरुण? यांच्या प्रतिष्ठेचे काय?
गुन्हा खरेच दाखल होईल का? की ‘तपास सुरू आहे’च्या गोळीत झोपवलं जाईल?
नळदुर्ग पोलिसांनी दोन दिवसांत गुन्हा दाखल करू असे सांगितले आहे, पण हा गुन्हा खरंच आरोपींवर होईल का, की एखाद्या छोट्या मोहरा बळी देऊन मोठे मासे सुटतील? गुन्ह्याला संरक्षण देणारे हातच पोलिसांना ‘तपास सुरू ठेवण्याचा’ सल्ला देत असतील का?
“आता वेळ आहे तरुणांनी आवाज उठवण्याची!”
फसवणूक झालेल्या तरुणांनी गप्प बसू नये, कोणत्याही दबावाला बळी पडू नये. आपल्या हक्कासाठी लढा द्यावा! धाराशिव लाइव्ह या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहे.
📞 ➡ संपर्क करा: 7387994411
गुन्हा दाखल होईल, की पुन्हा ‘चहापाणी’च? याचा पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी ‘धाराशिव लाइव्ह’ पाहत राहा!