नळदुर्ग : एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटालाही लाजवेल असा प्रकार नळदुर्गमध्ये समोर आला आहे. बँकेचे २५ लाख रुपये दरोडेखोरांनी लुटल्याचा बनाव करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यानेच ही रक्कम लंपास केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. कैलास घाटे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याने स्वतःवर ब्लेडने वार करून हे सर्व नाट्य रचल्याचे समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काय होता घाटेचा ‘स्क्रिप्ट’?
सोमवारी (दि. ३० जून) नळदुर्ग येथील लोकमंगल मल्टीस्टेटचा कर्मचारी कैलास घाटे आणि त्याचा एक सहकारी बँकेत जमा झालेले २५ लाख रुपये घेऊन मोटरसायकलवरून सोलापूरच्या मुख्य शाखेकडे निघाले. नळदुर्गपासून काही अंतरावर असलेल्या इटकळ गावाजवळ अचानक काही दरोडेखोर आले, त्यांनी बेदम मारहाण केली आणि पैशांची बॅग हिसकावून पळ काढला, असा थरारक ‘सीन’ घाटे याने पोलिसांसमोर कथन केला.
पोलिसांना का आला संशय?
सुरुवातीला घाटेची कहाणी ऐकून सर्वजण हादरले. पण अनुभवी पोलिसांच्या मनात काही प्रश्नांनी शंकेची पाल चुकचुकली:
- २५ लाखांची रक्कम मोटरसायकलवरून? इतकी मोठी रक्कम नेताना गाडी किंवा सुरक्षा व्यवस्था का नव्हती?
- महिन्याला फक्त १३ हजारांचा पगार! एवढ्या कमी पगाराच्या कर्मचाऱ्यावर बँकेने इतकी मोठी जबाबदारी का टाकली?
या प्रश्नांमुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
अन् अखेर बनाव उघड झाला!
स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास हाती घेताच या ‘कथे’मागील सत्य समोर आले. पोलिसांनी कैलास घाटेची कसून चौकशी केली आणि त्याच्या शरीरावरील जखमा तपासल्या. तेव्हा, त्याला दरोडेखोरांनी नव्हे, तर त्याने स्वतःच धारदार ब्लेडने किरकोळ जखमा करून घेतल्याचे उघड झाले. पोलिसांच्या प्रश्नांपुढे घाटेचा हा ‘सिनेमॅटिक’ बनाव गडगडला आणि त्यानेच २५ लाख रुपये लंपास केल्याचे स्पष्ट झाले.
या धक्कादायक प्रकारामुळे बँकेच्या कार्यपद्धतीवर आणि कर्मचाऱ्यांच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, यामागे आणखी कोणी आहे का, याचा शोध घेत आहेत.