नळदुर्ग (ता. तुळजापूर) – ‘घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ’ अशी ख्याती असलेले आपले लाडके आमदार राणा पाटील यांनी तुळजापूरकरांसाठी आणखी एक ‘घोषणा-गुगली’ टाकल्याची चर्चा सध्या नळदुर्गात जोरदार सुरू आहे. म्हणजे बघा, आमदारसाहेब सत्तेत असो वा नसो, त्यांच्या घोषणांचा स्पीड काही कमी होत नाही. गेल्या सहा वर्षांपासून ते आमदार आहेत, त्यातली तीन वर्षे तर सत्ताधारी पक्षाचे सदस्य! पण कामाचा पत्ता? तो मात्र ‘राम जाणे’ किंवा ‘राणा जाणे’!
काय होती ती ‘सुवर्ण’ घोषणा?
तर मंडळी, गोष्ट आहे २३ ऑक्टोबर २०२४ सालची. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना, लिंगायत मतदारांना खुश करण्यासाठी आमदारसाहेबांनी नळदुर्गात ‘राज्यातील पहिली बसवसृष्टी’ साकारणार असल्याची घोषणा केली. नुसती घोषणा नाही, तर तब्बल सहा एकर जागेवर ‘बसवसृष्टी’ स्तंभाचं पूजनही मोठ्या थाटामाटात पार पडलं. पाच कोटी रुपये मंजूर झाल्याचंही त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. ऐकून वाटलं की, आता नळदुर्गात बसवेश्वरांच्या विचारांचा जणू काही महामेरूच उभा राहणार!
पण झालं काय? ‘सहा महिने गेले, वीट काही हलेना!’
आता या घटनेला सहा महिने उलटून गेले. पण ज्या जागेवर ‘बसवसृष्टी’चं भव्य स्वप्न दाखवलं होतं, तिथे साधी एक वीट सोडा, साधा दगडही जागेवरून हललेला दिसत नाही. जणू काही कोनशिलाच ‘वन टू का फोर’ झाली की काय, अशी शंका नळदुर्गकरांना येऊ लागली आहे. स्तंभ पूजन झालं, फोटोसेशन झालं, भाषणं झाली, पण कामाचं काय? ते अजूनही ‘वर्क फ्रॉम होम’ मोडमध्येच आहे की काय, कोण जाणे!
जुन्या आठवणींचा ‘फ्लॅशबॅक’:
आमदारसाहेबांनी पूर्वीही या जागेसाठी ‘सातत्यपूर्ण पाठपुरावा’ केल्याचं सांगितलं होतं. राष्ट्रीय महामार्गालगतची वाहनतळासाठी आरक्षित असलेली सहा एकर जागा ‘विशेष बाब’ म्हणून बसवसृष्टी आणि वसंतराव नाईक स्मारकासाठी मिळवली. पाच कोटींचा निधीही उपलब्ध असल्याचं जाहीर केलं होतं. महात्मा बसवेश्वरांचा पूर्णाकृती पुतळा, ध्यानकेंद्र, आकर्षक बागबगीचा, लाईट अँड साऊंड शो… अरे व्वा! काय काय नाही! ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं होतं. वाटलं होतं, नळदुर्ग आता राज्याच्या पर्यटन नकाशावर ‘झक्कास’पैकी झळकणार.
नळदुर्गकरांचा सवाल: ‘साहेब, सृष्टी कधी दिसणार?’
आता नळदुर्गकर एकमेकांना कोपरखळ्या मारत विचारतायत, “अहो, ती ‘बसवसृष्टी’ नेमकी कधी ‘सृष्टीत’ येणार? का फक्त निवडणुकीपुरताच तो ‘सृष्टीचा देखावा’ होता?” घोषणांचे इंजिन सुसाट पळते, पण कामाचा डब्बा मात्र जागेवरच असल्याचं चित्र आहे.
पुढील अंक लवकरच?
आता आमदारसाहेब यावर कोणतं नवं स्पष्टीकरण देतात, की आणखी एखादी ‘सुपरहिट’ घोषणा करतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तोपर्यंत नळदुर्गकर आपल्या आमदारांच्या ‘घोषणा-पुराणा’तील या नव्या अध्यायाची चर्चा करत, ‘बसवसृष्टी’च्या प्रतीक्षेत आहेत – निदान त्या जागेवर उगवलेल्या गवताकडे बघत तरी!