नळदुर्ग: आधीच कामातील दिरंगाई, निकृष्टता आणि भ्रष्टाचाराने बरबटलेल्या सोलापूर-उमरगा राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग बायपासबाबत आता प्रशासनाचा खोटारडेपणा आणि जनतेची दिशाभूल करण्याचा नवा आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या दोन महिन्यांतच खड्ड्यांनी भरून मृत्यूचा सापळा बनलेला हा बायपास दोन दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद होता. यावर ‘धाराशिव लाईव्ह‘ ने आवाज उठवताच आणि लोकप्रतिनिधींनी विचारणा करताच, प्रशासनाने घाईघाईत रस्ता वाहतुकीसाठी सुरू केला खरा, पण त्यामागची कारणे आणि खुद्द सोलापूरच्या प्रकल्प संचालकांचा खोटारडेपणा उघड झाला आहे!
नळदुर्ग बायपासच्या दुरावस्थेबाबत आणि तो बंद असण्याबाबत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी त्यांचे खासगी स्वीय सहायक संतोष खोचरे यांच्यामार्फत सोलापूरच्या राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक यांना संपर्क साधून बायपास बंद का आहे, अशी विचारणा केली.
प्रकल्प संचालकांचा धक्कादायक खोटारडेपणा उघड!
खासदारांच्या कार्यालयातून विचारणा होताच, प्रकल्प संचालकांनी अक्षरशः थातूरमातूर आणि साफ खोटे कारण देत सांगितले की, “सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी बॉस्टिंग (स्फोट) सुरू असल्याने बायपास बंद होता आणि आता तो सुरू करण्यात आला आहे.”
पण वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळीच होती! आमच्या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून आणि प्रत्यक्ष परिस्थितीनुसार, हा बायपास प्रकल्प संचालकांनी फोनवर ‘सुरू करण्यात आला आहे’ असे सांगितल्यानंतर, म्हणजेच गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्षात वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला. याचाच अर्थ, प्रकल्प संचालक खासदारांच्या कार्यालयाला फोनवर बोलताना सर्रास खोटे बोलून दिशाभूल करत होते, हे सिद्ध झाले आहे!
बायपास सुरू झाला, पण खड्डे तसेच! कामाचा निकृष्ट दर्जा चव्हाट्यावर!
सर्वात लाजिरवाणी बाब म्हणजे, हा बायपास घाईघाईत वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला असला तरी, त्यावर दोन महिन्यांतच पडलेल्या खड्ड्यांची अवस्था ‘जैसे थे’ आहे! कामाचा दर्जा किती सुमार आहे, हे यावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. आमच्या प्रतिनिधीने आज सकाळी काढलेल्या छायाचित्रांमधून या बायपासवरील खड्ड्यांचे भीषण वास्तव समोर आले आहे. जनतेच्या पैशांची उधळपट्टी करून निकृष्ट काम करायचे आणि त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यावर थेट लोकप्रतिनिधींनाच खोटे बोलून वेळ मारून न्यायची, असाच काहीसा प्रकार सोलापूर-उमरगा महामार्गाच्या कामात सुरू असल्याचे यावरून दिसून येते.
आश्वासने हवेत, जीव धोक्यात!
एकीकडे नळदुर्ग बायपासचे दोन्ही मार्ग १५ एप्रिलपर्यंत सुरू करण्याचे आश्वासन देऊन ते पाळले नाही, दुसरीकडे दोन महिन्यांतच रस्ता खराब होऊन बंद पडतो आणि त्यावर आवाज उठवल्यावर अधिकारी चक्क खोटे बोलतात. सोलापूर-उमरगा महामार्गाचा हा अनागोंदी कारभार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा खोटारडेपणा जनतेच्या जीवाशी खेळणारा ठरत आहे. याप्रकरणी संबंधित प्रकल्प संचालकांवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. बायपासवरील खड्डे तातडीने बुजवून काम दर्जेदार करावे, अन्यथा जनतेचा उद्रेक अटळ आहे.