नळदुर्ग – येथे 22 जून रोजी झालेल्या कार आणि मोटरसायकलच्या अपघातात सुभाष थावरा राठोड (वय 50, रा. वसंतनगर) यांचा मृत्यू झाला. या अपघातात महावीर देविदास चव्हाण (वय 39, रा. वसंतनगर) हे गंभीर जखमी झाले आहेत. महावीर चव्हाण यांच्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 279, 337, 338, 304(अ) सह कलम 184, 134 अ, ब, मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जून रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास महावीर चव्हाण हे सुभाष राठोड यांना मोटरसायकलवरून घेऊन गंधोरा मार्गे लोहाराला जात होते. चिवरी पाटीजवळ एका अल्टो कार (क्र. एमएच 12 सी.के. 0417) चालकाने त्याची कार हायवेवर निष्काळजीपणे चालवत चव्हाण यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात सुभाष राठोड यांचा जागीच मृत्यू झाला तर महावीर चव्हाण गंभीर जखमी झाले.महावीर चव्हाण यांनी 24 जुलै रोजी या घटनेची तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कारचालकाचा शोध घेत आहेत.
ढोकी येथे मोटरसायकल अपघातात एक ठार
धाराशिव – ढोकी येथे 16 जुलै रोजी झालेल्या मोटरसायकल अपघातात दौलत संगीतराव गरड (वय 50, रा. जागजी) यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर ढोकी पोलीस ठाण्यात ऋषिकेश युवराज पाटील (रा. अपसिंगा) यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 281, 106(1), 106(2) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश पाटील हे दौलत गरड यांना बुलेट मोटरसायकल (क्र. एमएच 25 बीबी 9617) वरून जागजीहून ढोकीकडे घेऊन जात होते. बालाजी निवृत्ती मगर यांच्या शेताजवळील रस्त्यावर ऋषिकेश पाटील यांनी मोटरसायकल निष्काळजीपणे चालविल्याने दौलत गरड हे मोटरसायकलवरून खाली पडले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.दौलत गरड यांचे चिरंजीव निलकंट गरड यांनी 24 जुलै रोजी या घटनेची तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ऋषिकेश पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.