नळदुर्ग – नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. घरात एकटी असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका तरुणाने बळजबरीने घरात घुसून लैंगिक अत्याचार केला. इतकेच नव्हे, तर या घटनेचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडितेच्या भावाला आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी जातीवाचक शिवीगाळ करत लोखंडी रॉड व दगडाने बेदम मारहाण केली. या गंभीर प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात पोक्सो आणि ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात सोमवार, दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ च्या दरम्यान ही घटना घडली. पीडित १४ वर्षीय मुलगी घरी एकटी होती. ही संधी साधत गावातील एका तरुणाने तिच्या घरात प्रवेश केला आणि तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.
घाबरलेल्या पीडित मुलीने हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर पीडित मुलगी आणि तिचे नातेवाईक संबंधित तरुणाला जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी मुख्य आरोपीने त्यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच, पीडितेच्या भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यावेळी आरोपीच्या मदतीला आलेले इतर तीन तरुण आणि मुख्य आरोपी यांनी मिळून पीडितेच्या भावावर हल्ला चढवला. त्यांनी लोखंडी रॉड, काठी आणि दगडाने त्याला मारहाण करून जखमी केले आणि जिवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी पीडित मुलीने बुधवार, दि. १७ डिसेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात मुख्य आरोपीसह चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४, ६५ (बलात्कार), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५), तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) कलम ४, ६ आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट (अ.जा.ज.अ.प्र.) च्या विविध कलमान्वये अत्यंत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.






