नळदुर्ग – तुळजापूर तालुक्यातील दिंडेगाव येथे दिवसाढवळ्या घरफोडीची घटना घडली आहे. कुटुंब घराला कुलूप लावून शेतात गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला आणि कपाटातील ४३ ग्रॅम सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिंडेगाव (ता. तुळजापूर) येथील रहिवासी सचिन अशोक सुरवसे (वय २७ वर्षे) हे आपल्या नातेवाइकांसह १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजेच्या सुमारास घराचा मुख्य दरवाजा बंद करून कुलूप लावून शेतात कामासाठी गेले होते.
दुपारी ४.०० वाजेच्या सुमारास ते परत आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. अज्ञात चोरट्याने घराच्या छताचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला होता. चोरट्याने घरातील कपाटाचे कुलूप तोडून त्यातील ४३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ५४ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
सचिन सुरवसे यांनी १५ सप्टेंबर २०२६ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात येऊन दिलेल्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(३) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.
मुर्टा साठवण तलाव : मत्स्यपालन केंद्रावरून १४० किलो मासे लंपास; नळदुर्ग पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल
नळदुर्ग – तुळजापूर तालुक्यातील मुर्टा साठवण तलावावर सुरू असलेल्या मत्स्यपालन व विक्री केंद्रातून अज्ञात चोरट्यांनी दोन पोती भरून १४० किलो मासे चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
इंदिरानगर, नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथील रहिवासी ईस्माईल इसाक शेख (वय ३४ वर्षे) हे मुर्टा साठवण तलावावर मत्स्यपालन व मासे विक्रीचा व्यवसाय करतात.
तलावाच्या परिसरात विक्रीसाठी व साठवणुकीसाठी ठेवलेले सुमारे १२ हजार ६०० रुपये किमतीचे १४० किलो मासे (दोन पोती भरून) अज्ञात चोरट्याने शिताफीने पळवून नेले.
माशांची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर ईस्माईल शेख यांनी १५ सप्टेंबर २०२६ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.


