नळदुर्ग : शेतजमिनीच्या मालकी हक्कावरून एका ५९ वर्षीय शेतकऱ्याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चार जणांविरोधात नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना तुळजापूर तालुक्यातील काटगाव शिवारात रविवारी, १३ जुलै २०२५ रोजी घडली.
याप्रकरणी वसुदेव गेणदेव यादव (वय ५९, रा. नांदणी, ता. बार्शी, जि. सोलापूर, सध्या रा. नेरळ, नवी मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ते रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास काटगाव शिवारातील त्यांच्या गट क्रमांक ४५५ मधील शेतात असताना, आरोपी तेथे आले.
आरोपी कल्पेश सिताराम सोनगीवाले, अविनाश सिताराम सोनगीवाले, सिताराम छप्परसिंग सोनगीवाले आणि फुलचंद राणुसिंग सोनगीवाले (सर्व रा. घट्टेवाडी, ता. तुळजापूर, सध्या रा. लष्कर, सोलापूर) यांनी संगनमत करून फिर्यादीच्या शेतात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. “हे शेत आमचे आहे, तू इथे जमिनीची मशागत करायची नाही,” असे म्हणत त्यांनी फिर्यादी वसुदेव यादव यांना शिवीगाळ केली आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर वसुदेव यादव यांनी सोमवारी, १४ जुलै रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२९(३) (अनाधिकृत प्रवेश), ३५२ (धमकी देणे), ३५१(२) (शिवीगाळ) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.