नळदुर्ग: नळदुर्गहून उमरग्याकडे जाणाऱ्या नळदुर्ग घाटात शनिवारी सकाळी एका भीषण अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून, दुसरा पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.
उमरगा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल हिराचंद मुळे आणि गहिनीनाथ बिराजदार हे दोघे मोटारसायकलवरून उमरगा येथून धाराशिवकडे जात असताना हा अपघात झाला. नळदुर्ग घाटात मागून येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात पोलीस कॉन्स्टेबल मुळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर पोलीस कॉन्स्टेबल बिराजदार यांचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. जखमी बिराजदार यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
अर्धवट कामामुळे नागरिकांना त्रास
सोलापूर – संगारेड्डी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम मंजूर होऊन पंधरा वर्षे उलटली असली तरी सोलापूर ते उमरगा हा ९६ किलोमीटरचा रस्ता अजूनही अर्धवट आहे. अनेक ठिकाणी उड्डाणपुळे, वळण रस्ते अपूर्ण असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
नळदुर्ग घाट हा अवघड घाट असून या घाटातून अवजड वाहनांची वर्दळ असल्याने दररोज अपघात होत आहेत. आज झालेल्या एका अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून, दुसरा पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.
या महामार्गावरील नळदुर्ग बाह्य वळण रस्ता पूर्ण होण्याअगोदरच फुलवडी येथे टोल वसुली सुरू असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अर्धवट रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाहीये, अशी नागरिकांची तक्रार आहे.
या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून प्रशासनाने तातडीने या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
सोलापूर-संगारेड्डी महामार्ग: मृत्यूचा सापळा आणि प्रशासनाची बेफिकिरी