सोलापूर-संगारेड्डी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम मंजूर होऊन पंधरा वर्षे उलटली आहेत. पंधरा वर्षे म्हणजे एका पिढीचा कालावधी! एवढा मोठा कालावधी लोटूनही सोलापूर ते उमरगा हा ९६ किलोमीटरचा रस्ता अजूनही अर्धवट आहे. अनेक ठिकाणी उड्डाणपुळे, वळण रस्ते अपूर्ण आहेत. रस्त्याची ही दुरवस्था अपघातांना निमंत्रण देत आहे आणि दरवर्षी अनेक निष्पाप जीव या रस्त्यावर बळी पडत आहेत.
या महामार्गावरील नळदुर्ग बाह्य वळण रस्ता पूर्ण होण्याअगोदरच फुलवडी येथे टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. अर्धवट रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना टोल भरावा लागत आहे, ही त्यांच्याशी होणारी क्रूर चेष्टा आहे. अर्धवट रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाहीये, ही बाब आणखी चिंताजनक आहे.
अणदूर, जळकोट, दस्तापूर आदी ठिकाणचे उड्डाणपुल अर्धवट अवस्थेत आहेत. नवीन कंत्राटदार नियुक्त केला जातो, त्यास स्थानिक राजकीय नेते, कार्यकर्ते टक्केवारी मागतात आणि तो पळून जातो. मग पुन्हा नवीन कंत्राटदार येतो आणि पुन्हा तीच परिस्थिती. या दुष्टचक्रातून मार्ग कधी बाहेर पडणार? रस्त्याचे काम रखडण्यामागे भ्रष्टाचार आणि प्रशासनाची उदासिनता हे प्रमुख कारण आहे.
नळदुर्ग घाट हा अवघड घाट आहे. या घाटातून अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्त्याची दुरवस्था आणि अवजड वाहनांची वर्दळ यामुळे या घाटात दररोज अपघात होत आहेत. या अपघातात अनेक निष्पाप जीव जात आहेत. कुणाची आई, कुणाचा बाप, कुणाचा भाऊ, कुणाची बहीण, कुणाचा नवरा, कुणाचा मुलगा जात आहे. ही जीवितहानी थांबायला हवी.
प्रशासनाने तातडीने या प्रकरणात लक्ष घालावे. रस्त्याचे काम पूर्ण करावे, उड्डाणपुळे पूर्ण करावे, भ्रष्टाचार थांबवावा आणि नागरिकांच्या सुरक्षेची हमी द्यावी. ही आमची प्रशासनाला विनंती आहे.