तुळजापूर – तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे उपजिल्हा रुग्णालयासमोर नवरा-बायकोच्या किरकोळ भांडणातून एका हृदयद्रावक घटनेने परिसर हादरून गेला आहे. चहा-पान टपरी चालवणाऱ्या या दाम्पत्याचे भांडण इतके विकोपाला गेले की, संतप्त पतीने पत्नीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली आणि नंतर स्वतःलाही चाकूने भोसकून घेतले. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाला आहे.
नेमके काय घडले?
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला आणि तिचा पती हे दोघेही नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर चहा-पान टपरी चालवत होते. त्यांच्यात नेहमीच किरकोळ कारणांवरून भांडणे होत असत. आज सकाळीही त्यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर पतीने संतापाच्या भरात पत्नीवर चाकूने वार केले. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पतीने स्वतःच्या पोटात आणि मानेवर चाकूने वार करून घेतले.
रुग्णालयात दाखल
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या पतीला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून तपास सुरू
नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पतीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याची चौकशी करून घटनेची सविस्तर माहिती मिळवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
चारित्र्याच्या संशयावरून खून
चहा-पान टपरी चालवणारे या जोडप्याचे आडनाव कुरेशी असून, चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करून, पतीने स्वतःला भोसकून घेतल्याचे समोर आले आहे. मयत महिलेचे नाव सुलताना अब्दुलवाहेद कुरेशी ( वय ४०) असून आरोपी पतीचे नाव अब्दुलवाहेद बिलाल कुरेशी (वय ४५) असे आहे.