नळदुर्ग – ‘लांडगा आला रे आला’ ही गोष्ट आपण सर्वांनी ऐकली आहे, पण नळदुर्गच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी तर याचा थेट ‘लाइव्ह अनुभव’ घेतला आहे. गेल्या वर्षभरात तब्बल तीन वेळा ‘पालकमंत्री येणार’ म्हणून फ्लेक्सबाजीने शहर दणाणून सोडणाऱ्या कार्यकर्त्यांचा उत्साह, पालकमंत्र्यांनी दिलेल्या हुलकावणीमुळे पार विरून गेला होता. मात्र, नियतीचा खेळ बघा! ज्यावेळी कोणीही अपेक्षा केली नाही, फ्लेक्स लावले नाहीत, तेव्हाच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी नळदुर्ग किल्ल्याला ‘अचानक’ भेट देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
त्याचं झालं असं की, वर्षभरात तीन-तीन वेळा पालकमंत्री येणार म्हणून बिचाऱ्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने मोठमोठे फ्लेक्स लावले, स्वागताची जय्यत तयारी केली. पण प्रत्येक वेळी ऐन क्षणी दौरा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले आणि फ्लेक्सच्या खर्चाचा ‘भुर्दंड’ तेवढा शिल्लक राहिला. जवळच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्घाटनाला येऊनही पालकमंत्र्यांनी किल्ल्याकडे पाठ फिरवल्याने तर कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला होता.
या अनुभवातून शहाणे झालेले कार्यकर्ते यावेळी मात्र शांत होते. कदाचित, ‘आपण फ्लेक्स लावले की मंत्री येत नाहीत’ असा काहीसा ‘अपशकुनी’ विचार त्यांच्या मनात आला असावा. त्यामुळे रविवारी ना शहरात फ्लेक्स लागले, ना स्वागताचा थाटमाट! सगळीकडे शांतता होती. आणि याच शांततेचा फायदा घेत, सकाळी ११ च्या सुमारास पालकमंत्री प्रताप सरनाईक थेट नळदुर्ग किल्ल्यात दाखल झाले!
ज्यावेळी मंत्री येणार म्हणून गावभर चर्चा होती, तेव्हा ते आले नाहीत आणि आज जेव्हा कुणाला साधा पत्ताही नव्हता, तेव्हा ते चक्क येऊन गेले. काही वेळातच “पालकमंत्री येऊन गेले” ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि नळदुर्गकरांमध्ये एकच हशा पिकला. सरतेशेवटी, “पालकमंत्री कधी येणार याची नाही, तर ते कधी येऊन गेले हेच कळलं नाही,” अशी विनोदी चर्चा शहरात दिवसभर रंगली होती.
एकीकडे तीन वेळा वाया गेलेल्या फ्लेक्सच्या खर्चाची हळहळ, तर दुसरीकडे ऐनवेळी मंत्री येऊन गेल्याने ‘चुकलेल्या दर्शना’ची खंत, अशा दुहेरी कात्रीत कार्यकर्ते सापडले असून, पालकमंत्र्यांच्या या ‘गुप्त’ दौऱ्याची चर्चा नळदुर्गात चांगलीच चवीने चघळली जात आहे.