नळदुर्ग : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची विक्री करणाऱ्यांविरोधात नळदुर्ग पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ईटकळ येथील एका पान टपरीवर छापा टाकून पोलिसांनी विक्रीसाठी ठेवलेला ९,११६ रुपये किमतीचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १३ जून) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, ईटकळ येथील भाईजान पान शॉपमध्ये प्रतिबंधित गुटख्याची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती नळदुर्ग पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून पान टपरीवर छापा टाकला. यावेळी टपरीचालक इसाक गफुर खुदादे (रा. ईटकळ) हा विक्रीच्या उद्देशाने प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखू जवळ बाळगलेला आढळून आला.
पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून, आरोपी इसाक खुदादे याच्याविरोधात नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम २७४, २७५, २२३ आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम ५९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.