नळदुर्ग : नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या पथकाने जुगार विरोधी कारवाई दरम्यान दोन ठिकाणी छापे टाकून गांजा जप्त केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण 380 ग्रॅम वजनाचे गांजा सदृश्य अमली पदार्थ आणि 7,600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. 26 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6.20 वाजल्यापासून रात्री 9.35 वाजेपर्यंत नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. पहिल्या कारवाईत आरोपी आयुब फकिरसाब शेख (वय 63 वर्षे, रा. अक्कलकोट रोड, नळदुर्ग) याच्याकडून 188 ग्रॅम वजनाचे गांजा सदृश्य अमली पदार्थ आणि 3,760 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीने पिरके यांचे देशी दारूच्या दुकानाच्या जवळील टपरीमध्ये गांजाची चोरटी विक्री करण्याचा प्रयत्न केला होता.
दुसऱ्या कारवाईत आरोपी इस्माईल बशीर शेख (वय 62 वर्षे, रा. नळदुर्ग) याच्याकडून 192 ग्रॅम वजनाचे गांजा सदृश्य अमली पदार्थ आणि 3,840 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीने बी.के. फक्शन हॉलच्या पुढे आपल्या राहत्या घरात चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने गांजा बाळगला होता.
दोन्ही कारवायांमध्ये पोलीसांनी मुद्देमाल ताब्यात घेतला असून आरोपींवर एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम-8(सी), 20(बी), ii(a) अन्वये स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पुढील तपास नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे.