नळदुर्ग – शेतामध्ये गायी चारण्यास विरोध केल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका महिलेला पाच जणांनी मिळून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. इतकेच नाही, तर आरोपींनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील दागिने हिसकावून घेत जिवे मारण्याची धमकीही दिली. ही धक्कादायक घटना तालुक्यातील अणदूर शिवारात घडली असून, याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कविता विजय राठोड (वय ४०, रा. वसंत नगर, नळदुर्ग) असे पीडित महिलेचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना २४ जुलै रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अणदूर शिवारातील शेत गट क्रमांक ९६ मध्ये घडली. कविता राठोड यांच्या सोयाबीनच्या शेतात आरोपी आपली गुरे चारत होते. यावेळी कविता यांनी त्यांना ‘शेतात गाई चारू नका,’ असे म्हटले.
याचा राग आल्याने आरोपी देविदास काशिनाथ राठोड, भारताबाई काशिनाथ राठोड, ज्योतील देविदास राठोड, रोहीत धोंडीराम चव्हाण, आणि नता काशिनाथ राठोड (सर्व रा. वसंत नगर, नळदुर्ग) यांनी मिळून कविता यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. तसेच, ‘तुला जिवे ठार मारू’ अशी धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी फिर्यादी कविता यांच्या गळ्यातील सोन्याचे मणीमंगळसूत्र आणि कानातील बाळ्या हिसकावून घेतल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेनंतर कविता राठोड यांनी २५ जुलै रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार मारहाण, दरोडा आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. नळदुर्ग पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.