परंडा: दरोडा टाकण्याच्या उद्देशाने शस्त्रे आणि मिरची पूड घेऊन दबा धरून बसलेल्या एका मोठ्या टोळीचा डाव परंडा पोलिसांनी उधळून लावला आहे. परंडा-पाचपिंपळा रोडवरील गायरान जमिनीत लपून बसलेल्या या टोळीतील ८ जणांना पोलिसांनी शिताफीने अटक केली असून, त्यांच्याकडून २ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. २९) दुपारी अडीचच्या सुमारास करण्यात आली.
नेमकी घटना काय?
दि. २९ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २.२० वाजण्याच्या सुमारास परंडा ते पाचपिंपळा रोडवर उजव्या बाजूला असलेल्या गायरान जमिनीतील पाझर तलावाच्या खड्ड्यात काही लोक संशयास्पदरीत्या लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली असता, तिथे ८ जण दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेले आढळून आले.
अटक करण्यात आलेले आरोपी:
या कारवाईत पोलिसांनी एका महिलेसह ८ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची नावे खालीलप्रमाणे:
१. सुरज कृष्णा काळे (वय २४ वर्षे, रा. इंदिरानगर वस्ती, भूम) २. आप्पा आज्या काळे (वय ६५ वर्षे, रा. साकत खु.) ३. नवनाथ रामा भोसले (वय ७६ वर्षे, रा. त्रिंत्रज, ता. भूम) ४. अभिमान कल्याण पवार (वय ५४ वर्षे, रा. इंदिरानगर, भूम) ५. नरही नवनाथ भोसले (वय ३५ वर्षे, रा. त्रिंत्रज) ६. गणेश मच्छिंद्र काळे (वय ३३ वर्षे, रा. इंदिरानगर वस्ती, भूम) ७. शोभा गणेश काळे (वय ३५ वर्षे, रा. इंदिरानगर वस्ती, भूम) ८. चिमू दशरथ काळे (वय १९ वर्षे, रा. वालवड, ता. भूम)
शस्त्रसाठा आणि वाहने जप्त:
पोलिसांनी या टोळीकडून गुन्ह्यात वापरण्यात येणारी ४ मोटरसायकल, १ काटवणी, १ कोयता, लोखंडी कटर, लाल तिखटाची पुडी, सुतळी दोरी आणि ५ मोबाईल फोन असा एकूण २ लाख १५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१० (४) आणि ३१० (५) अन्वये दरोड्याचा प्रयत्न आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद केल्यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.







