धाराशिव: धाराशिव तालुक्यातील २३ गावांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीसाठी महायुती सरकारने ११३ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत बंद पाईपलाईनद्वारे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचविले जाणार असल्याने पाण्याचा अपव्यय टाळला जाईल आणि सिंचन क्षेत्र सहा हजार हेक्टरवरून नऊ हजार हेक्टरवर जाईल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.
केशेगाव, करजखेडा आणि पाटोदा येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. “तुळजापूर, धाराशिव आणि औसा या तीन तालुक्यातील २३ गावांसाठी ही योजना अत्यंत महत्वपूर्ण आहे. या योजनेच्या दुरुस्तीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी स्वतः भेटून निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी विभागाच्या समन्वयाने दुरुस्तीच्या कामास मंजुरी मिळाली आहे,” असे आमदार पाटील म्हणाले.
“तेरणा धरणातून तेर येथे याच प्रकारे बंद पाईपलाईनद्वारे योजना राबविण्यात आली होती. काही तांत्रिक अडचणींमुळे त्यात बाधा निर्माण झाल्या होत्या. आता नवीन तंत्रज्ञानामुळे या अडचणी दूर झाल्या आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी बंद पाईपलाईनचा वापर करून योजना यशस्वीरित्या राबविल्या जात आहेत,” असेही ते म्हणाले.
“२३ गावांतील सहा हजार हेक्टर क्षेत्र या योजनेमुळे पाण्याखाली येणार होते. आता त्यात दीडपट वाढ होऊन नऊ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. कमी वेळेत पाण्याचा अपव्यय न होता जास्तीत जास्त पाणी उपलब्ध होईल. निम्न तेरणा योजनेसाठी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे ४२ दलघमी पाणी आरक्षित करून ठेवण्यात आले आहे. त्यात काहीही बदल झालेला नाही आणि होणारही नाही,” असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.